आता गायीला इजा करण्याचा विचारही केला तरी शिक्षा, वाचा नेमकं काय म्हणालं आहे उच्च न्यायालय…
केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा, कारण गायीच्या रक्षणातच देशाचे कल्याण आहे.
लखनऊ : भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्व आहे. तसेच हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते. तर गोमांसावरून देशात राजकारण चांगलेच तापले होते. उत्तरप्रदेशासह देशात गोमांसावरून मॉब लिंचिगचे प्रकार घडले आहेत. उत्तरप्रदेश सरकारने गोहत्या बंदीचा कायदा पारित केला आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत उत्तरप्रदेशात जावेद नावाच्या व्यक्तीवर गोहत्येचा गुन्हा दाखल असून सध्या तो अटकेत आहे.
गोहत्येचा गुन्हा असलेल्या जावेदच्या जामीन याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती शेखर यादव यांनी आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळली. तर न्यायमुर्ती यादव याचिका फेटाळताना म्हणाले की, गोरक्षा आणि त्याला प्रोत्साहन देणं कुठल्याही धर्माशी जुळलेलं नाही. तर गाय ही भारतीय संस्कृतीचं प्रतिक आहे. त्यामुळे गायीचं रक्षण करणे हे देशातील प्रत्येक नागरीकाचं कर्तव्य आहे. तो नागरीक कोणत्याही धर्माचा असो वा कोणत्याही जातीचा असो, त्याने गायींच रक्षण करायला हवे.
भारतात सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. देशातील नागरीकांचा धर्म जरी वेगळा असला तरी देशाच्या बाबतीत सर्व नागरीकांचा विचार एक आहे. त्यामुळे नागरीक कोणत्याही धर्माचा असला तरी त्याने गायींचं रक्षण करायला हवं. त्यामुळे संसदेत विधेयक आणून केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा, कारण गायीच्या रक्षणातच देशाचे कल्याण आहे, असं मत जामीनावरील सुनावणीवेळी न्यायमुर्ती यादव यांनी व्यक्त केले.
तसेच न्यायमुर्ती यादव म्हणाले की, गायीची हत्या करणे हा मोठा गुन्हा आहेच. मात्र गायीला इजा करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा व्हायला हवी. कारण गायीच्या संरक्षण करण्यामुळे देशाचं कल्याण होईल.