दूधदरात वाढ..! पण शेतकऱ्याची झोळी रिकामीच राहणार, मग कोणाचा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!
मुंबई : गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. पण त्याचा शेतकरी वा सामान्य दूधउत्पादकांना फारसा फायदा होणार नाही. कारण, दुधातील ही दरवाढ ‘अमूल’ (Amul) या प्रसिद्ध कंपनीने केली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या ग्राहकांच्या खिशावरील ताण आणखी वाढणार, हे मात्र निश्चित..!
कोरोना संकटात अन्नपदार्थांच्या किंमती वाढल्या होत्याच; आता त्यात ‘अमूल’च्या दुधाची भर पडली आहे. आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. ‘अमूल’चे दूध आजपासून (ता. १ जुलै) देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे.
इनपुट आणि उत्पादनखर्चात झालेल्या वाढीमुळे हे पाऊल उचलले आहे. देशात ‘अमूल’ दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. आता अहमदाबादमध्ये अर्ध्या लिटर ‘अमूल गोल्ड’ची किंमत 30 रुपये, तर अर्धा लिटर ‘अमूल ताझा’ची किंमत 24 रुपये असेल, असे गुजरात मिल्क को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग लिमिटेड (GCMMF) अमूलचे एमडी डॉ. आर. एस. सोधी यांनी सांगितले.
अमूल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला. कंपनीने आपल्या सर्वच ब्रँडमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. आजच्या वाढीमुळे आता ‘अमूल गोल्ड’चा दर 58 रुपये प्रति लिटरवर गेला आहे. शिवाय अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम एन्ड ट्रीम दूध यांच्या दरातही लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अहमदाबादमध्ये ‘अमूल गोल्ड’च्या अर्धा लिटरसाठी 29 रुपये, अमूल ताजासाठी 23 रुपये, तर अमूल शक्ती दुधासाठी 26 रुपये मोजावे लागणार आहेत. दुधाच्या दोन रुपये वाढीमुळे एमआरपीत 4 टक्के वाढ दिसून येते, जे सरासरी अन्नधान्य चलनवाढीपेक्षा खूपच कमी आहे.
दुधाचे दर वाढल्यानंतर आता अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतींतही वाढ होण्याची शक्यता आहे. पनीर, लोणी, तूप, ताक, लस्सी, आईस्क्रीमच्या किंमतीही वाढू शकतात, असे सांगण्यात आले.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.