Crop Insurance । संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आज पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेता येईल.
मागील वर्षी राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. यावर्षी आत्तापर्यंत १ कोटी ५७ लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून सुरुवातीला १५ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.
पण केंद्र सरकारने या योजनेसाठी वाढीव मुदत दिल्याने शेतकऱ्यांना आजपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नाही त्यांच्याकडे आज या योजनेत सहभाग घेण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे १ कोटी ४ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे. यासाठी ५१ हजार १८३ कोटी रूपयांची संरक्षित रक्कम असून आलेल्या एकूण अर्जांतून एक रूपया प्रतिअर्ज याप्रमाणे १ कोटी ५८ लाख ४० हजार रूपये जमा झाले आहेत. तर सीएससी केंद्रचालकांना विम्याच्या हप्त्यापोटी ७ हजार ६०३ रूपये द्यावे लागतील. तर यातील ४५० कोटी राज्य सरकार तर ३ हजार ९३ कोटी रूपये विमा हप्ता केंद्र सरकार देणार आहे.