मुंबई : कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेट मालिकेतही दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा दणदणीत पराभव केला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तर एकही सामना जिंकता आला नाही. भारतीय संघाच्या या कामगिरीवर आता चौफेर टीका होत आहे. कर्णधार के. एल. राहुलवर माजी क्रिकेटपटू कठोर शब्दांत टीका करत आहेत. असे असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मात्र राहुलला पाठिंबाच दिला आहे.
राहुल द्रविडने सांगितले, की ‘मला वाटते की त्याने खूप चांगले काम केले आहे. सामन्यात पराभूत संघ म्हणून उभे राहणे कोणत्याही कर्णधारासाठी सोपे नसते. त्याने नुकतीच कर्णधार म्हणून सुरुवात केली आहे.’ तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात 7 गडी राखून मोठा विजय नोंदवला. तिसरा सामना भारतीय संघ जिंकेल असे वाटत होते, मात्र रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने फक्त 4 रन्सने विजय मिळवला.
द्रविड पुढे म्हणाला, की ‘तो या सर्व गोष्टी शिकेल. एकदिवसीय सामन्यांमध्ये काही गोष्टींमध्ये आम्ही थोडे कमी होतो आणि मला वाटते की त्याने त्याचे काम चांगले केले. एक असा खेळाडू शिकत असतानाच पुढे जात आहे आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करत आहे आणि कर्णधार म्हणून अधिक मजबूत होत आहे’, अशा शब्दांत द्रविडने के. एल. राहुलचे कौतुक केले.
दरम्यान, या नंतर आता पुढील महिन्यात वेस्ट इंडिज बरोबर एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेट मालिका होणार आहे. कोरोनामुळे बीसीसीआयने या मालिकेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना रविवार 6 फेब्रुवारी रोजी, दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना बुधवार 9 फेब्रुवारी रोजी, तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. त्याचवेळी T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी 16 फेब्रुवारी रोजी, दुसरा सामना शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी आणि शेवटचा सामना रविवार 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता शहरातील मैदानावर होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाचा पराभव केला आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज विरोधात संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
… म्हणून ‘या’ माजी क्रिकेटपटूने विराटला चांगलेच सुनावले; जाणून घ्या, कोणत्या वादाचे ठरतेय कारण ?