मुंबई : आजच्या दिवसात महागाईने दोन जबरदस्त झटके दिले आहेत. आधी घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानंतर आता किरकोळ महागाई दरातही मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात या दोन्ही प्रकारच्या महागाईत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खरेतर, ‘किरकोळ महागाई’ फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांसह 8 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी 2022 मध्ये 6.07 टक्के होता. एक वर्षाआधी याच महिन्यात ते 5.03 टक्के होते, तर जानेवारी 2022 मध्ये ते 6.01 टक्के होते.
फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई वाढण्याचे मुख्य कारण खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या महिन्यात, अन्न-संबंधित उत्पादनांच्या किमती 5.89 टक्क्यांनी वाढल्या, जे जानेवारीत 5.43 टक्क्यांनी वाढल्या होत्या.
तसेच घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई फेब्रुवारी 2022 मध्ये 13.11 टक्क्यांवर पोहोचला. सोमवारी सरकारी आकडेवारीद्वारे ही माहिती मिळाली आहे. घाऊक महागाई एप्रिल 2021 पासून सलग 11 व्या महिन्यात 10 टक्क्यांच्या वर राहिली आहे. जानेवारी 2022 मध्ये WPI 12.96 टक्के होता, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तो 4.83 टक्के होता. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांची महागाई जानेवारीत 10.33 टक्क्यांवरून 8.19 टक्क्यांवर आली.
दरम्यान, सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात महागाई अत्यंत वेगाने वाढत चालली आहे. रशिया युक्रेन युद्धाचाही त्यावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. देशातही महागाई वेगाने वाढत चालली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ज्या बाबतीत अंदाज व्यक्त केला जात होता अखेर तसेच घडले आहे. फेब्रुवारी महिन्यातील महागाईची आकडेवारी समोर आली आहे. घाऊक किंमत निर्देशांक जानेवारीत 12.96 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.
फक्त भारत नाही, तर अमेरिकाही ‘त्या’ संकटाने हैराण.. पहा, जागतिक संकट कशामुळे वाढतेय..?