नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घालत आहे. हा घातक आजार संपणार तरी कधी, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की जर जागतिक समुदायाने व्यापक उपाययोजना केल्या तर 2022 मध्ये कोरोना आजार संपुष्टात येऊ शकतो. टेड्रोस म्हणाले की WHO राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर पुरावे, धोरण, उपकरणे आणि तंत्रज्ञानासह काम करत आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, की जर देशांनी या सर्व रणनीती आणि साधनांचा सर्वसमावेशक वापर केला तर आपण या वर्षी कोरोनाच्या कठीण परिस्थितीवर मात करू शकू. WHO कार्यकारी मंडळाच्या 150 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी टेड्रोस म्हणाले की, अशा आपत्कालीन परिस्थितींना रोखण्यासाठी साथीच्या रोगापासून धडे घेण्याची आणि नवीन उपाय विकसित करण्याची गरज आहे. यासाठी आपण आजार संपेपर्यंत थांबू नये, असे त्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचे आणखीही काही व्हेरिएंट निर्माण होण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जगात काही देश असेही आहेत की ज्यांना अजूनही कोरोना प्रतिबंधक लसी मिळालेल्या नाहीत. आणि काही देशात तर या लसींचे प्रचंड नुकसान होत आहे. आफ्रिकेतील बहुतांश देशांना लसी मिळालेल्या नाहीत. काही देशांना मिळाल्या पण त्या खूप कमी संख्येने. तर काही देशांना लसी मिळत असतानाही त्यांनी या लसी घेण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, या देशातील बहुतांश लोकांचे लसीकरण झालेले नाही. काही देशात अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे श्रीमंत देशांत वेगाने लसीकरण सुरू आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता काही देशात लसींचे बूस्टर डोसही सुरू केले गेले आहेत.
लसीकरणाची अशी परिस्थिती असताना आता या लसीकरणाबाबत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी काही दिवसांपूर्वी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले होते, की कोरोना संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. कोरोनाच्या संकटाचा सामना समानता आणि निष्पक्षतेसह केला पाहिजे. जोपर्यंत आपण जगातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यात यश मिळवणार नाही, तोपर्यंत कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत राहतील आणि हे व्हेरिएंट अर्थव्यवस्था ठप्प करत राहतील.
.. म्हणून प्रत्येकाचेच लसीकरण गरजेचे..! पहा, नेमका काय इशारा दिलाय संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी