Corona : कोरोना संसर्गाचे धडकी भरविणारे आकडे पुन्हा समोर येत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 19 हजार 893 नवीन रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत आज सुमारे अडीच हजार नवीन रुग्ण वाढले आहेत. या दरम्यान 53 जणांचा मृत्यू झाला. यासह, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Corona Patient) संख्या देखील 1,36,478 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गामुळे आणखी 53 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,26,530 झाली आहे. देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,36,478 वर आली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.31 टक्के आहे. गेल्या 24 तासांत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत 579 ची घट नोंदवण्यात आली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.50 टक्के आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू संसर्गाचे 1932 नवीन रुग्ण आढळले, तर राज्यात संसर्गामुळे सात जणांचा मृत्यू झाला. राज्यात संसर्गाची नवीन प्रकरणे आल्यानंतर बाधितांची संख्या 80,52,103 वर पोहोचली आहे. तर 7 जणांच्या मृत्यूनंतर संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,48,117 वर पोहोचली आहे. तर पाच जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत मुंबईत 434 नवीन रुग्ण आढळले आहेत.
बुधवारी दिल्लीत (Delhi) कोरोना विषाणू संसर्गाची 2,073 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 5 रुग्णांचा मृत्यू झाला. तर संसर्ग दर 11.64 टक्के होता. राष्ट्रीय राजधानीत लागोपाठ तिसऱ्या दिवशी संसर्गाचा दर 10 टक्क्यांच्या वर गेला आहे. याआधी 24 जानेवारी रोजी दिल्लीत संसर्ग दर 11.79 टक्के नोंदवला गेला होता. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत एकूण 19,60,172 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर या प्राणघातक विषाणूमुळे 26,321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) गेल्या 24 तासांत आणखी 501 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची खात्री झाली आहे. यानंतर राज्यातील कोविड रुग्णांची एकूण संख्या 11,67,517 झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, संसर्गमुक्त झाल्यानंतर 11 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तर 522 जणांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला.