मुंबई – वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत (Under 19 World Cup) भारतीय क्रिकेट संघाने सुपर लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, कोविड-19 चा संघावर वाईट परिणाम झाला असून संघातील अर्धा डझन खेळाडूंना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
त्याचा परिणाम आयर्लंडविरुद्ध ब गटातील दुसऱ्या सामन्यात दिसून आला जेव्हा संघाचा कर्णधार यश धुल आणि इतर अनेक खेळाडूंशिवाय मैदानात उतरला. भारताकडे केवळ 11 खेळाडूंचा पर्याय होता, त्यांनी या सामन्यात क्षेत्ररक्षण केले आणि जिंकले.
चारवेळची चॅम्पियन भारताला स्पर्धेत अजून बराच पल्ला गाठायचा आहे, अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाच राखीव खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सहारन, अभिषेक पोरेल (wk) ऋषित रेड्डी, अंश गोसाई आणि पीएम सिंग राठोड यांना बिसीसीआय वेस्टइंडीजला पाठवणार आहे.
सूत्राने सांगितले की, बोर्डाने पाच राखीव खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे आल्यावर ते सहा दिवस विलगीकरणामध्ये असतील. आम्हाला आशा आहे की संघ त्यांच्या ब गटात अव्वल असेल जेणेकरून प्रत्येकजण तंदुरुस्त असेल आणि खेळासाठी उपलब्ध असेल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना २९ जानेवारीला होणार आहे.
भारताने आपले सुरुवातीचे दोन्ही गट सामने जिंकले असून आता त्यांचा सामना शनिवारी युगांडाशी होणार आहे.
याआधी दुसऱ्या सामन्याच्या दिवशी बीसीसीआयने कळवले होते की कर्णधार यश आणि उपकर्णधार रशीद यांच्यासह संघातील चार खेळाडू आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी आणखी दोन खेळाडूंमध्ये लक्षणे दिसून आली आणि त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला, त्यानंतर कर्णधारासह पाच खेळाडू शेवटच्या गट सामन्यातून बाहेर पडले होते.