Corona : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी कोरोना विषाणूच्या (Corona Virus) साथीच्या समाप्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) सांगितले की कोरोना संपलेला नाही, परंतु त्याचा शेवट दिसत आहे. जगभरात कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. तेव्हापासून साथीचा रोग आता शेवटच्या टप्प्यात आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
डब्ल्यूएचओ (World Health Organisation) प्रमुख म्हणाले की कोरोना संपला याचा अर्थ असा नाही की आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. होय, आम्ही पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. जगभरातील साप्ताहिक मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. जानेवारी 2021 च्या तुलनेत आम्ही सध्या 10 टक्के आहोत. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येचे लसीकरण (Vaccination) झाले आहे. ज्यामध्ये तीन चतुर्थांश आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध लोकांचा समावेश आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, की जगातील बहुतेक देशांमध्ये लागू करण्यात आलेले कोरोना (Corona) निर्बंध रद्द करण्यात आले आहेत आणि जनजीवन पुन्हा साथीच्या आजारा पूर्वीसारखे होत आहे. काही देशांमध्ये, विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीकरणामध्ये अजूनही बरेच अंतर आहे.
ते पुढे म्हणाले, की असे अनेक अडथळे आहेत ज्याकडे आपण लक्ष दिले नाही तर ते आपल्याला त्रास देऊ शकतात. आपण हे करू शकतो आणि करू अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोनाची परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत प्रत्येकजण सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. याचा अर्थ असा की प्रत्येकाने आवश्यकतेनुसार सुरक्षित राहण्यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे आवश्यक आहे. याचा अर्थ प्रत्येकाला सुरक्षा उपकरणे मिळणे आवश्यक आहे. ते म्हणाले की कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अजूनही केवळ 19 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे.