दिल्ली : देशात अजूनही कोरोनाचे थैमान सुरुच आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 3,37,704 नवीन रुग्ण आढळले असून 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,13,365 झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 5.43 टक्के आहे. त्याच वेळी, रिकव्हरी दर 93.31 टक्के आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,42,676 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच या आजारातून आतापर्यंत 3,63,01,482 रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी, ओमिक्रॉनची 10,050 प्रकरणे आतापर्यंत आढळून आली आहेत, ज्यामध्ये आदल्या दिवशी 3.69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या, पॉजिटिविटी दर 17.22 टक्के आहे आणि साप्ताहिक पॉजिटिविटी दर 16.65 टक्के आहे.
आकडेवारीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना लसीचे 161.16 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत 71.34 कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,60,954 नमुने तपासण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे, की केंद्र सरकार देशभरात लसीकरणाच्या वेगात वाढ करण्याचे नियोजन करत आहे. कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी 21 जून 2021 पासून नवीन टप्पा सुरू करण्यात आला. अधिकाधिक लसी उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे. या अंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या उपलब्धतेबद्दल आगाऊ माहिती दिली जाते, जेणेकरून ते लसींचे अधिक चांगले नियोजन करू शकतील आणि लसीची पुरवठा साखळी सुधारू शकतील.
मंत्रालयाने माहिती दिली आहे, की आतापर्यंत केंद्र सरकारकडून मोफत आणि थेट राज्य सरकारी खरेदी चॅनेलद्वारे लसीचे 160.58 कोटी (1,60,58,13,745) डोस राज्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या, कोविड-19 लसीचे 12.79 कोटी (12,79,45,321) अतिरिक्त आणि न वापरलेले डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
देशात 7 ऑगस्ट 2020 रोजी संक्रमितांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली होती. देशात 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 2020 रोजी 90 लाखांवर गेली. प्रकरणे एक कोटीचा टप्पा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला होता आणि 23 जून 2021 रोजी तीन कोटींच्या पुढे गेला होता.