नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असताना आज मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 55 हजार 874 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात कोरोना आणि ओमिक्रॉनची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती, मात्र आज यामध्ये 50 हजारांची घट झाली आहे. याआधी सोमवारीही नवीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे, कोरोनाचा धोकादायक प्रकार असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नवीन प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे.
मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 2 लाख 55 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सध्या देशभरात 22 लाख 36 हजार 842 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक या आजारातून बरेही झाले आहेत.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घालत आहे. हा घातक आजार संपणार तरी कधी, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सोमवारी म्हटले होते, की जर जागतिक समुदायाने व्यापक उपाययोजना केल्या तर 2022 मध्ये कोरोना आजार संपुष्टात येऊ शकतो. टेड्रोस म्हणाले की WHO राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर पुरावे, धोरण, उपकरणे आणि तंत्रज्ञानासह काम करत आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, की जर देशांनी या सर्व रणनीती आणि साधनांचा सर्वसमावेशक वापर केला तर आपण या वर्षी कोरोनाच्या कठीण परिस्थितीवर मात करू शकू. WHO कार्यकारी मंडळाच्या 150 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी टेड्रोस म्हणाले की, अशा आपत्कालीन परिस्थितींना रोखण्यासाठी साथीच्या रोगापासून धडे घेण्याची आणि नवीन उपाय विकसित करण्याची गरज आहे. यासाठी आपण आजार संपेपर्यंत थांबू नये, असे त्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचे आणखीही काही व्हेरिएंट निर्माण होण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अर्र.. घ्या आता.. ‘त्यासाठी’ ही कोरोनाच जबाबदार; पहा, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी काय केलाय दावा..