दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागाचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 5233 नवे रुग्ण (Increase In Corona Patient) आढळून आले आहेत. तर एका दिवसापूर्वी 3741 कोरोना रुग्ण सापडले होते. म्हणजेच एका दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका दिवसात इतक्या रुग्णांची नोंद अनेक महिन्यांनंतर झाली आहे. याबरोबरच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. आता देशात 28 हजार 857 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 3 हजार 345 लोक कोरोनातून बरे झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. यासह, देशातील कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,24,715 वर पोहोचली आहे. कोरोनाचे आकडे पाहता या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाने जोर पकडला आहे. 1 जून ते 7 जून या कालावधीत दररोज सुमारे चार हजार प्रकरणांची नोंद होत आहे. तर, आठवड्याच्या अखेरीस 5 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली. आकडेवारी पाहिल्यास 1 जूनला 2745, 2 जूनला 3712, 3 जूनला 4041, 4 जूनला 3962, 4 जूनला 4270, 6 जूनला 4518 आणि 7 जूनला 3741 प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी, आज 5233 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) प्रमुखांनी रविवारी इशारा दिला, की कोविड आजार अद्याप संपलेला नाही. त्यांनी सरकारांना सांगितले की, ‘आम्ही आमचे संरक्षण नियम आमच्या जबाबदारीवर कमी करतो.’ जिनिव्हा येथे संस्थेच्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन करताना डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले, की ” नमुन्यांची चाचणी आणि क्रमवारी नसणे म्हणजे आम्ही विषाणूच्या उपस्थितीकडे डोळेझाक करत आहोत.”
त्यांनी असेही नमूद केले की कमी उत्पन्न असलेल्या देशांतील सुमारे एक अब्ज लोकांना अँटी-कोविड लसीचा (Anti Covid Vaccine) डोस मिळणे बाकी आहे. जागतिक परिस्थितीवर आधारित अलीकडील साप्ताहिक अहवाल पाहता, घेब्रेयेसस म्हणाले की मार्चपासून नवीन संसर्गामध्ये अनेक आठवडे घट झाल्यानंतर प्रकरणांमध्ये स्थिरता दिसून आली आहे. तर मृत्यूंची संख्या देखील कमी झाली आहे. ते म्हणाले की, परिस्थितीत सुधारणा होऊनही आणि जगातील 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण (Vaccination) झाले असले तरी, जोपर्यंत साथरोग सर्वत्र संपत नाही तोपर्यंत आजार सर्वत्र संपला असे म्हणता येणार नाही.
कोरोनाबाबत WHO प्रमुखांनी पुन्हा दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; जाणून घ्या, महत्वाची माहिती..