दिल्ली : जागतिक संकट ठरलेल्या कोरोना विषाणूने आता दक्षिण कोरियात थैमान घातले आहे. देशात कोविड-19 संसर्गाची नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत, त्यामुळे देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने शनिवारी सांगितले, की दक्षिण कोरियामध्ये तब्बल 3,83,665 कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यामुळे एकूण संक्रमणांची संख्या 6,206,277 झाली आहे. यासह, देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांचे हे नवीन रेकॉर्ड ठरले आहे.
ओमिक्रॉन, कोविड-19 चे नवीन प्रकार देशभर पसरला आहे, ज्यामुळे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत. कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सी (KDCA) नुसार, शनिवारी असे नोंदले गेले की ओमिक्रॉन प्रकारामुळे नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आणि दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. विषाणूमुळे गंभीर प्रकरणांबद्दल सांगितले तर, या स्थितीत असणाऱ्या संक्रमित लोकांची संख्या 1,066 इतकी आहे, जी मागील दिवसाच्या तुलनेत 50 ने कमी झाली आहे.
बोत्याच वेळी, देशात एकूण 269 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि यासह देशातील मृत्यूंची संख्या 10,144 वर गेली आहे. देशात कोरोनाच्या उद्रेकादरम्यान, 44,903,107 लोकांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली आहे आणि पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 44,428,431 आहे, तर बूस्टर डोस मिळालेल्या लोकांची संख्या 32,064,014 आहे.
दरम्यान, जगात अनेक देशात कोरोना अजूनही थांबलेला नाही. चीनमधील काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे येथे काही ठिकाणी कठोर लॉकडाऊन केले आहे. हाँगकाँगमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे या संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भारतात मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने कमी होत आहे. देशात कोरोनाचे लसीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेल्याचे सांगण्यात आहे. आज देशात मे 2020 नंतर प्रथमच अत्यंत कमी म्हणजे फक्त 3614 नवे रुग्ण आढळले आहेत.
कोरोना अपडेट : मे 2020 नंतर प्रथमच सापडले ‘इतके’ कमी रुग्ण; पहा, काय आहे देशातील परिस्थिती..