दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाचा वेग मंदावला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जगभरातील सर्व देश पुन्हा एकदा कोरोना आधीच्या परिस्थितीत येताना दिसत आहेत. मात्र, चीनमधून एक टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने जोर पकडल्याचे दिसत आहे. चीनचे शांघाय शहर सध्या पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात असून येथील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी चीन सरकारने शांघायमध्ये अनेक निर्बंध लादले आहेत.
कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या रुग्णांनंतर सरकारने असे काही निर्बंध लादले आहेत, की ज्यामुळे तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना संसर्गामुळे पालकांना मुलांपासून दूर नेले जात आहे. लहान मुले आणि पालकांना स्वतंत्र क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता चीन सरकारचे कठोर निर्बंध पाहून जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे, की ज्या कुटुंबांमध्ये लोक कोरोना संक्रमित होत आहेत तेथे मुले आणि पालकांना वेगळे ठेवले जात आहे. सरकार इतके कठोर झाले आहे की मुले आणि पालक नेमके कुठे आहेत हे सुद्धा सांगितले जात नाही. शहरातील अनेक लोक आपल्या मुलांचे ठिकाण जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडे विनवणी करत आहेत.
दरम्यान, जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यामध्ये युरोप आणि आशियातील काही देशांचा समावेश आहे. सध्या चीनमध्ये (China) कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. अगदी कठोर उपाययोजना करुन कोरोना आटोक्यात आणल्याचा दावा करणाऱ्या चीनला कोरोनाने हैराण केले आहे. काही दिवसांपासून येथे कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. एरव्ही दोन किंवा तीन रुग्ण सापडले तरी कठोर लॉकडाऊन (Lockdown) करणाऱ्या या देशात आता 1 मार्चपासून अतिशय वेगाने कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडले आहेत. सध्या देशातील परिस्थिती आधिक गंभीर आहे, असे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अमेरिका आणि चीन कोरोनाने हैराण..! चीनमध्ये आणखी एका शहरात कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या अपडेट