Congress President Election : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्यानंतर आता दिग्विजय सिंह (Digvijay Singh) हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागणे जवळपास निश्चित आहे. मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार आहेत. सध्या त्यांचा सामना शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्याशी होणार आहे.
दिग्विजय सिंह यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली. मल्लिकार्जुन खर्गे हे माझे नेते असल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या घरी भेट घेतली. उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर दिग्विजय सिंह सातत्याने पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता कोणत्या नेत्यांमध्ये स्पर्धा होणार हे लवकरच स्पष्ट होईल असे दिसते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आहेत आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे समर्थक कार्यालयाबाहेर जमले आहेत. एका समर्थकाने सांगितले की, आम्हाला सचिन पायलट यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. ही आमची मागणी आहे. काँग्रेसमध्ये तळागाळातील नेते निर्माण झाले नाहीत, तर काँग्रेसची ही विभागणी होतच राहणार आहे.