Congress President : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस (Congress) मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. अनेक दशकांनंतर, गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस नेतृत्वाने राजस्थानचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना अध्यक्ष होण्यास सांगितल्याची माहिती आहे. मात्र, गेहलोत यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) अध्यक्ष करा, असे अनेकवेळा सांगितले आहे. नुकतेच त्यांनी असेही म्हटले होते की, जर राहुल अध्यक्ष झाले नाहीत तर पक्षात निराशा येईल आणि अनेक लोक घरी बसतील.
21 सप्टेंबरपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. पक्ष आपला सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करणार आहे. दरम्यान, एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांना पक्षाची सूत्रे हाती घेण्याची विनंती पक्ष नेतृत्वाने केल्याचे समजते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण पक्षाची जबाबदारी सांभाळू शकत नसल्याचेही सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आधीच सांगितले आहे.
गेहलोत यांनी मात्र अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचीच एकमताने निवड करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. गेहलोत म्हणाले की, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतरच पक्षाची पुनर्रचना करता येईल, असे ते वारंवार सांगत आहेत. ते अध्यक्ष झाले नाही तर नेते व कार्यकर्त्यांची निराशा होणार आहे. राहुल गांधींवर पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आम्ही सतत विनंती करत राहू.
दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष न होण्यावर ठाम असतील तर त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. गेहलोत यांना मिळालेल्या ऑफरचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे राजस्थानमधील पक्षातील असंतोष मिटविण्यासाठी गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदी बढती देऊन सचिन पायलट (Sachin Pilot) यांना मुख्यमंत्रीपद देऊन नवीन चेहरा घेऊन राजस्थानच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. अशा प्रकारे पक्ष राजस्थानलाही लक्ष्य करेल आणि राष्ट्रीय पातळीवर बिगर गांधी अध्यक्ष करून काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची सुरुवात करू शकेल.