Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची (Congress President Election) परिस्थिती आता स्पष्ट होताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि झारखंड काँग्रेसचे नेते के. एन. त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. थरूर यांनी आज दुपारी एआयसीसी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर ते म्हणाले, की मी खर्गे साहेबांचा खूप आदर करतो. अनेकांनी अर्ज भरले तर चांगली गोष्ट आहे आणि लोकांना पर्यायही मिळेल. मी हे कोणाचाही अपमान करण्यासाठी केलेले नाही. आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीच्या समर्थकांमध्ये पक्षाचे नेते अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, एके अँटनी, पवनकुमार बन्सल आणि मुकुल वासनिक यांचा समावेश होता. G23 गट नेते आनंद शर्मा आणि मनीष तिवारी, ज्यांनी काँग्रेसमध्ये बदल करण्यास सांगितले होते, ते देखील खर्गे यांच्या नामांकनाच्या समर्थकांमध्ये होते. तिवारी म्हणाले की, खर्गे हे पक्षातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत.
झारखंड काँग्रेसचे नेते के. एन. त्रिपाठी (KN Tripathi) यांनीही पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर केला जाईल, असे सांगितले. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याबाबत आपण किती गंभीर आहोत आणि यासंदर्भात पक्षाच्या नेतृत्वाबरोबर काही चर्चा झाली आहे का, असे विचारले असता त्रिपाठी यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही आहे. शेतकऱ्याचा मुलगा अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखळ करू शकतो. भाजपमध्ये (BJP) मात्र हे शक्य नाही.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज पक्षप्रमुखपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसून, त्यांचे सहकारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीमध्ये ते प्रस्तावक असतील, असे त्यांनी सांगितले. सिंग म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आहे आणि यापुढेही करत राहीन.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर सिंह यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत नामनिर्देशनपत्रांचे 10 ‘सेट’ घेतले. काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमांतर्गत निवडणूक लढवण्यासाठी गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.