Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला (Congress President Election) एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना या पदासाठी कोण उमेदवार असतील याबाबतचे चित्र थोडेसे स्पष्ट होताना दिसत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्यानंतर आता शशी थरूरही (shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, यावर आतापर्यंत काहीही स्पष्टता नाही. मात्र, राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, शशी थरूर यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपला दावेदारी केली आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि गुजरात काँग्रेस युनिटनंतर आता बिहार, महाराष्ट्र, काश्मीर आणि तामिळनाडूसह अनेक राज्य घटकांनीही राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. सोमवारी अनेक राज्य काँग्रेस समित्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठरावही मंजूर केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्ष पक्षाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रतिनिधींची यादी जाहीर करणार आहे. याआधी पाच खासदारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून पक्षप्रमुख निवडीतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि निर्वाचक मंडळ तयार करणाऱ्या पीसीसी प्रतिनिधींची यादी सर्व मतदार आणि संभाव्य उमेदवारांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदी पुनर्नियुक्तीच्या मागणीवरून झालेल्या गदारोळात, पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी खात्री केली आहे, की सोमवारी झालेल्या बैठकीत शशी थरूर पुढील काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवतील, असे दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. शशी थरूर यांच्याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे 26 सप्टेंबरला राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचेही बोलले जात आहे. म्हणजेच आतापर्यंत शशी थरूर विरुद्ध अशोक गेहलोत सामना जवळपास निश्चित आहे. शशी थरूर आता स्वत: निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jayram Ramesh) म्हणाले की, कोणाला निवडणूक लढवायची आहे, त्याचे स्वागत आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांची ही सातत्यपूर्ण भूमिका आहे. ही एक लोकशाही आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. निवडणूक लढण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार असून, 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.