Congress President Election : आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत (Congress President Election) स्थिती स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या शब्दावर ठाम असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी म्हटले आहे. या पदासाठी त्यांनी राहुल गांधींना विनंती केली होती. पण यावेळी अध्यक्ष गांधी घराण्यातील बाहेरचा असेल असे राहुल म्हणाले. विशेष म्हणजे, अशोक गेहलोत लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार हे निश्चित, त्यासाठी लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवसही निश्चित करणार असल्याचे ते म्हणाले.
अशोक गेहलोत म्हणाले की, विरोधकांनी बळकट होण्याची गरज आहे. अशोक गेहलोत लवकरच राजस्थान राज्याचे मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा आहे. आता मुख्यमंत्रीपदाची धुरा कोण घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसचे पुढील अध्यक्ष असल्याचे मानले जात आहे. गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर आता शंका नाही. याआधी अशोक गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आता अशोक गेहलोत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत काँग्रेस अध्यक्षपदाची उमेदवारी प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. गेहलोत उमेदवारी अर्ज भरतील असे जवळपास निश्चित मानले जात आहे. असे असले तरी शशी थरूर (Shashi Tharoor), मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे हे नेते काय निर्णय घेतात, पक्षनेतृत्वाने दिलेला आदेश मानतात का, निवडणूक बिनविरोध होईल का या प्रश्नाची उत्तरे मिळण्यासाठी आणखी काही काळ थांबावे लागणार आहे.