पणजी : देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसने गोवा निवडणुकीतही एन्ट्री घेतली आहे. तसेच आम आदमी पक्ष सुद्धा रिंगणात आहे. त्यामुळे या लहान राज्यातील निवडणूक आधिक अटीतटीची होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. यामुळे भाजपसह काँग्रेसच्याही अडचणी वाढल्या आहेत, या पक्षातील अनेक जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आप नंतर तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
चिदंबरम म्हणाले, की तृणमूल काँग्रेसने युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, एकीकडे हा प्रस्ताव दिल्यानंतर दुसरीकडे कुडतरी, वास्को, मुरगावमध्ये तृणमूलने काँग्रेसचे नेते पळवले, हे योग्य नाही. काँग्रेसच्या उमेवारांनी पक्ष सोडणार नाही, अशी शपथ शनिवारी घेतली, या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना चिदंबरम म्हणाले, की या आधीचा पक्षांतराचा इतिहास पाहता उमेदवारांकडून शपथ घेणे गरजेचे होते. लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा. आम्हाला राज्यात सरकार स्थापन करता यावे म्हणून सर्व उमेदवारांकडून शपथ घेतली.
दरम्यान, याआधी तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. तृणमूल काँग्रेस विरोधी मतांचे विभाजन करत असल्याचा आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांत नाकारला. अभिषेक बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाले होते, की तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये समविचारी पक्षांना गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तसा इतरांनी दिला नाही. आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा अन्य काँग्रेसशासित राज्यांत गेलो असतो. पण, आम्ही कुठे गेलो, आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजप सरकार असलेल्या गोव्यात आलो.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा दावा आहे, की त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहेत. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी 24 डिसेंबर रोजी त्यांना गोव्यातील नागरिकांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले होते. पण, स्वतःच्या क्षुल्लक उद्दीष्टांच्या पुढे जाण्यात ते अपयशी ठरले.