Congress Bank Accounts Frozen । राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्या जागेवर कोणता उमदेवार असणार आता यांच्या नावाची देखील चर्चा जोरात सुरु झाली आहे.
अशातच आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. एकीकडे देशातील राजकीय पक्षांना प्राप्तिकरातून १०० टक्के सूट मिळालेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडे २१० कोटींचा कर थकीत असल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पक्षाची अडचण वाढली आहे.
आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी जोडलेली चार बँक खाती गोठवली असून दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे बँक खाते गोठवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवले. या दोघांच्या गोठवलेल्या खात्यांमधून प्राप्तिकर विभागाकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागण्यात आली आहे. काँग्रेसला ही रक्कम आयकर विभागाला दंड म्हणून भरावी लागेल.
नेमकं कारण काय?
हे संपूर्ण प्रकरण 2018-2019 च्या आयकर रिटर्नशी संबंधित असून आयकर विभागाने काँग्रेसकडून दंड म्हणून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. काँग्रेस नेते आणि खजिनदार अजय माकन यांच्या मते या कारवाईमागे दोन कारणे आहेत. प्रथम- आम्हाला आमच्या खात्याशी संबंधित माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत आयकर विभागाला द्यायची होती.
त्यावेळी रिटर्न 40-45 दिवस उशिरा सादर केले होते. लोकांना 10-15 दिवस उशीर होतो. दुसरे म्हणजे 2018-19 हे निवडणुकीचे वर्ष होते. त्या निवडणुकीच्या वर्षात काँग्रेसने १९९ कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी 14 लाख 40 हजार रुपये काँग्रेस खासदार आणि आमदारांनी त्यांच्या पगाराच्या रूपात जमा केले. हे पैसे रोख स्वरूपात जमा केले आहेत. अशातच आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने रोख रक्कम मिळाल्यामुळे काँग्रेसला 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. काँग्रेसला यामुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे.