दिल्ली – भविष्यातील रणनिती तयार करण्यासाठी काँग्रेस नव्या संकल्पनेच्या तयारीत आहे. यामध्ये पक्षाचे नेते संघटना मजबूत करण्यापेक्षा निवडणुकीतील (Election) विजयावर अधिक भर देत आहेत. काँग्रेसने नव्या मित्रपक्षांचा शोध घ्यावा, असे बहुतांश सदस्यांचे मत आहे. राज्य पातळीवर आघाडी झाली पाहिजे.
एका नेत्याने सांगितले की, अभिषेक मनू सिंघवी, प्रमोद तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी ‘एकला चलो’ मॉडेल स्वीकारण्यासाठी फारसा वेळ नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे आघाडीची शक्यता तपासली पाहिजे. मात्र, सर्वच नेते आघाडीवर एकमत नाहीत. एकट्याने निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही, असे मत अनेक नेत्यांचे होते. नव्या ठरावात आधीच ठरलेल्या मुद्द्यांवरच चर्चा होत असल्याबद्दल काही सदस्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. अनेक सदस्यांना पराभवाच्या कारणांवर चर्चा हवी होती, मात्र पुढील मार्गावर चर्चा करण्याचे सांगण्यात आले.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार काँग्रेसच्या (Bihar Congress) नेत्यांनी आघाडीला विरोध केला. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी काँग्रेसला (Congress) बळकट करणे आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. सर्वात मोठा फरक हा पराभवाच्या कारणांच्या चिंतनाचा आहे. पराभवाच्या कारणांवर पक्षश्रेष्ठींना मत व्यक्त करायचे आहे. राजकीय समितीत झालेल्या चर्चेदरम्यान ईव्हीएमचा (EVM) मुद्दाही पुढे आला. याचाही विचार व्हायला हवा, असे अनेक सदस्यांनी सांगितले, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
संकल्प शिबिरात सहभागी झालेल्या बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. रविवारी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भाषणा दरम्यान युवा नेते अशी मागणी करू शकतात, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. शिबिरात सहभागी होणारे नेते पन्नाशीच्या आतील आहेत. काँग्रेसने ‘चिंतन शिविर’मधून (Chintan Shivir) ‘चिंतन’ हा शब्द काढून टाकला आहे. नव संकल्प शिबिराचे बॅनर लावून पक्षाची चर्चा सुरू आहे. पराभवाच्या कारणांवर चर्चा होऊ नये म्हणून असे करण्यात आल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. सर्व सदस्य फक्त भविष्यातील रणनितीवर (Strategy In Future) मत व्यक्त करत आहेत.