China : श्रीलंकेवर (Sri Lanka) दबाव आणून आपले हेरगिरी जहाज पाठवल्यानंतर चीन (China) आता पाकिस्तानात (Pakistan) आपले सैन्य पाठवण्याचा विचार करत आहे. संघर्षग्रस्त पाकिस्तान-अफगाणिस्तान (Afghanistan) भागात चीनने लक्षणीय गुंतवणूक (Investment) केली आहे. ड्रॅगनने आपल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) अंतर्गत या क्षेत्रात पाण्यासारखा पैसा ओतला आहे. मात्र येथेही चिनी कामगारांवर हमले झाले आहेत. आता अशी बातमी आहे की या प्रदेशात आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी चीनला खास बनवलेल्या चौक्यांमध्ये स्वतःचे सैन्य तैनात करायचे आहे. खरे तर चीनला पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या माध्यमातून मध्य आशियात आपला प्रभाव वाढवायचा आहे. ड्रॅगनने दोन्ही देशांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या मोठी गुंतवणूक केली आहे.
विशेष म्हणजे, चीनचे तंत्र संशोधन जहाज ‘युआन वांग 5’ मंगळवारी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या हंबनटोटा बंदरावर पोहोचले. हे चिनी हेर जहाज बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि उपग्रह शोधण्यात सक्षम आहे. चीनची जहाजे श्रीलंकेच्या बंदरांपर्यंत पोहोचल्याने भारताला (India) काळजी आहे आणि चीन या प्रदेशात सागरी प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे लक्षण आहे. कोलंबोतील श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, युआन वांग-5 हे जहाज बंदरात एका मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे एक आठवडा थांबेल.
पाकिस्तानबद्दल सांगितले तर भारताचा शेजारी देश आधीच चीनच्या कर्जात आहे. पाकिस्तानमधील चीनची गुंतवणूक 60 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या वर गेली आहे. पाकिस्तान केवळ आर्थिकच नव्हे तर लष्करी आणि राजनैतिक पाठबळासाठीही चीनवर अवलंबून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने पाकिस्तानवर आपले सैन्य तैनात करण्यासाठी चौक्या बांधण्यास परवानगी देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. तालिबान शासित अफगाणिस्तान अजूनही अनेक बाबतीत चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. पाकिस्तानमधील राजनैतिक आणि सुरक्षा सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये लष्करी चौक्या उभारण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.
एका राजनैतिक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे राजदूत नोंग रोंग यांनी या संदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि लष्करप्रमुखांबरोबर बैठका घेतल्या आहेत. राजदूत रोंग या वर्षी मार्च 2022 अखेरपर्यंत पाकिस्तानमध्ये नव्हते, ते नुकतेच देशात आले होते. तथापि, ज्या बैठकीत त्यांनी चिनी सैन्यासाठी चौक्या तयार करण्याचे आवाहन केले ती बहुधा नवीन सरकार आणि राज्याच्या प्रतिनिधींबरोबर राजदूत रोंग यांची पहिली औपचारिक बैठक होती.
सूत्राने सांगितले की, चीनचे राजदूत सातत्याने चिनी प्रकल्पांची सुरक्षा आणि तेथील नागरिकांच्या सुरक्षेवर भर देत आहेत. चीनने याआधीच ग्वादरमध्ये सुरक्षा चौक्यांची मागणी केली असून ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर लढाऊ विमानांसाठी करण्याची परवानगीही मागितली आहे. लष्करी कामासाठी वापरता येणारी ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे.