China Taiwan Tension : जागतिक पातळीवर आपल्या आक्रमक रणनीतीमुळे (China Taiwan Tension) एकाकी पडत असलेल्या चीनने आपल्या शेजाऱ्यांचा त्रास सतत वाढवला आहे. पुन्हा एकदा ड्रॅगनने तैवानच्या (Taiwan) हवाई सीमेजवळ आपली लढाऊ विमाने पाठवून युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एक अलर्ट जारी केला की चीनने गेल्या 24 तासांत आपल्या लष्करी हालचालींमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या काळात तैवानने हवाई सीमेजवळ 103 चीनी लढाऊ विमाने शोधून काढली.
अलीकडच्या काळात तैवानला धोका देण्यासाठी चीनने पाठवलेली ही सर्वात मोठी लढाऊ विमाने आहेत. 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान चीनने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने हे स्वतःसाठी आणि या दोन्ही दरम्यान असलेल्या सामुद्रधुनीसाठी चिंतेचा विषय असल्याचे वर्णन केले आहे. निवेदनात म्हटले आहे की चीनने तैवानचा सतत लष्करी छळ केल्याने केवळ तणाव वाढणार आहे आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती बिघडू शकते. तैवानने चीनला अशा कारवाया त्वरित थांबवण्यास सांगितले आहे.
चीनने फक्त तैवानच नाही तर अनेक देशांना त्रास देण्याचे काम चालवले आहे. गरीब देशांना आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली त्यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा खरतनाक खेळ चीनी राज्यकर्त्यांनी चालवला आहे. या कर्जाच्या सापळ्यात आफ्रिकेतील अनेक देश अडकले आहेत. दक्षिण आशियातील पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळसह अनेक देशही या संकटात अडकलेच आहेत. आता या देशांना चीनच्या कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडणे सहजासहजी शक्य होणार नाही एवढे मात्र नक्की.