China Taiwan Tension : अमेरिकी सभागृहाच्या अध्यक्षा नेन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या तैवान भेटीवर चीनचा संताप अद्याप संपलेला नाही. अमेरिकेवर चिडलेल्या चीनने आता युरोपीय संघातील देशांवर संताप व्यक्त केला आहे. चीनने युरोपियन युनियनमध्ये (European Union) सहभागी 7 देशांच्या राजदूतांना बोलावून निषेध व्यक्त केला आहे. तैवानच्या (Taiwan) सीमेवर चीनचा लष्करी सराव चुकीचा असून तो त्वरित थांबवावा, असे निवेदन या देशांच्या वतीने जारी करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले, की उपमंत्री डेंग ली यांनी निषेध व्यक्त केला आणि युरोपीय देशांना सांगितले की, त्यांच्यावतीने वक्तव्ये देणे म्हणजे आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे होय. ते अजिबात स्वीकारता येत नाही.
अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला विरोध करण्यासाठी चीनने (China) युद्ध सराव सुरू केला आहे. तैवानच्या आखातात त्याच्या बाजूने क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर जहाजे तैनात करण्यात आली असून युद्ध विमानेही आकाशात उडत आहेत. चीन तैवानला आपला भाग मानत आहे आणि गरज भासल्यास लष्करी मोहिमेद्वारे देखील हा भाग जोडू शकतो. चीनची काही लढाऊ विमाने तैवानच्या आकाशातूनही गेली आहेत.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे, की चीनने लष्करी जहाजे त्याच्या अगदी जवळ पाठवली आहेत. चिनी जहाजांकडून बफर झोन पार करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. तैवान आणि चीनमध्ये अनेक दशकांनंतर असा तणाव पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर चीनच्या आक्रमकतेचा परिणाम जपानपर्यंत (Japan) दिसून येत आहे. जपानमधील हातेरुमा येथील इकॉनॉमिक झोनमध्ये चिनी क्षेपणास्त्रे पडली आहेत. जपानने यावर आक्षेप घेतला असून हा आपल्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. तैवानशी चांगले संबंध असलेल्या देशांपैकी जपान देखील एक आहे.
दरम्यान, चीनला पुन्हा एकदा नॅन्सी पेलोसी यांनी आव्हान दिले आहे. भविष्यात अमेरिकनही तैवानमध्ये जातील आणि हिंमत असल्यास चीनने त्यांना रोखून दाखवावे. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) म्हणाले की, चीनचा आक्रमक लष्करी सराव हा अत्यंत काळजीचा मुद्दा असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला धोका आहे.