दिल्ली : चीनमध्ये कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. एकाच दिवसात तब्बल 25,071 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्याच्या कोरोनाच्या लाटेत एका दिवसात संसर्गाची ही सर्वाधिक संख्या आहे. देशाची आर्थिक राजधानी शांघायमध्ये जवळपास अडीच कोटी लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. शुक्रवारी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने देशात कोविडची 24,100 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली. अहवालानुसार, शांघायमध्ये संसर्गाची 824 पॉजिटिव्ह प्रकरणे आणि 20,398 लक्षणे नसलेली नोंद झाली आहेत. त्याच वेळी, चीनमध्ये स्थानिक संसर्गाची सुमारे 1,540 नवीन प्रकरणे नोंदली गेली. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात कोविडचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशातील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ही सर्वाधिक वाढ आहे.
दुसरीकडे शांघायमध्ये कोरोनाबाबतच्या कठोर धोरणावर सर्वत्र टीका होत आहे. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी त्याचे समर्थन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी चीनला सुवर्णपदक मिळायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. जिनपिंग म्हणाले, की ‘काही परदेशी खेळाडूंनी म्हटल्याप्रमाणे, जर कोरोनाविरूद्ध सुवर्णपदक असेल तर चीन त्यास पात्र आहे. जगभरातील कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सर्व सहभागींच्या आरोग्याला प्राधान्य देतो. देशात कोरोना विषाणूचा पुन्हा प्रवेश रोखतो आणि नवीन साथीच्या रोगास कारणीभूत ठरू नये यासाठी प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.’
शांघायमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी धडपडणाऱ्या चीनने देशभरातील 10,000 हून अधिक आरोग्य कर्मचारी आपल्या सर्वात मोठ्या शहरात तैनात केले आहेत. यामध्ये 2,000 हून अधिक लष्करी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरात सलग सहाव्या दिवशी संसर्गाची 20 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन लाऊन चौकशी करावी लागली आहे.