China Projects in Himalaya: दिल्ली : भारताचा शेजारी आणि छोटा बफर देश असलेल्या नेपाळला बळकावण्यासाठी चीनने सर्व शक्ती पणाला लावण्याचे ठरवले आहे. नुकतेच नेपाळच्या पोखरा या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) याद्वारे नेपाळमध्ये बांधलेला हा पहिला प्रकल्प असल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, त्याचवेळी नेपाळ सरकारचा दावा आहे की हा प्रकल्प चीनच्या निधीतून बांधला गेला असला तरीही तो बीआरआयचा भाग नाही. एकूणच चीनचा कावा उघडकीस आल्याने नेपाळ आता वेगळ्या वळणावर याबाबत भाष्य करताना पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातून काय साध्य होणार हाच मुद्दा आहे. (China Belt And Road Initiative Projects In Nepal Pokhara Airport To China Nepal Railway)
कारण नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील दोन आठवड्यांच्या आत काठमांडूचे चिनी प्रभारी वांग जिन यांच्यासमवेत या विमानतळाचे उद्घाटन केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पंतप्रधानपदी खूश होऊन आता चीनने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला नेपाळ-चीन सीमा व्यापार पुन्हा सुरू केला आहे. तसेच BRI अंतर्गत ट्रान्स-हिमालय कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरचा एक भाग म्हणून केरुंग आणि काठमांडू दरम्यान रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी चीनने काठमांडूला एक टीम पाठवली आहे.
अलीकडच्या काळात चीन आणि नेपाळमधील वाढत्या जवळीकीनेही भारतासह जगाचे लक्ष वेधले आहे. तर त्याचवेळी या चिंतेला उत्तर देताना चीनचे अधिकृत माध्यम ग्लोबल टाइम्सने भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ग्लोबल टाइम्सने लिहिले की, नेपाळ-चीनमधील वाढत्या संबंधांचा भारताने हेवा वाटून घेऊ नये. तथापि, जगभरातील तज्ज्ञ चीन-नेपाळ आर्थिक संबंधांकडे भौगोलिक राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. कारण, याद्वारे भारतीय उपखंडात चीनचा हस्तक्षेप आणखी वाढणार आहे.
दरम्यान, रशियन मीडिया स्पुतनिकनेही भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक महेंद्र पी लामा यांच्याशी चीनबद्दल याबाबत चर्चा केली. लामा ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी भारत सरकारने नियुक्त केलेल्या नॉर्थ ईस्ट रिजन व्हिजन 2035 टीमचे प्रमुख आहेत. लामा हे सरकार-नियुक्त प्रख्यात व्यक्ती गट (EPG) चे सदस्य देखील होते. याची स्थापना 1950 च्या भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करारामध्ये बदलांची शिफारस करण्यासाठी करण्यात आली होती.
नेपाळला जोडणारी कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याची चीनची क्षमता या प्रश्नाच्या प्रत्युत्तरात प्रा. महेंद्र लामा म्हणाले की, चीनने हिमालयीन प्रदेशात कनेक्टिव्हिटी प्रकल्प विकसित करण्याची तांत्रिक क्षमता यापूर्वीच अनेकदा दाखवून दिली आहे. तिबेटच्या अतिउंच प्रदेशात त्यांनी वाहतूक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. तसेच चेंगडू ते ल्हासा (सिचुआन तिबेट रेल्वे) या कठीण प्रदेशात हाय-स्पीड रेल्वे आणली आहे. मात्र, नेपाळमधील हिमालयातून रेल्वे मार्ग आणण्याचा विकास हा निव्वळ व्यावसायिक आणि व्यापाराशी संबंधित कारणांसाठी आहे की आणखी काय हेतु आहे? चीनकडे काही मोठे छुपे धोरणात्मक कारण आहे का? नेपाळी लोकांना जगातील काही उंच पर्वतांमधून जाणारा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी संभाव्य पर्यावरणीय खर्चाची जाणीव आहे का? आणि त्यामुळे केरुंग-काठमांडू रेल्वेमार्ग विकसित करणे हा सोपा प्रकल्प अजिबात होणार नाही का? असेही प्रश्न आहेतच की.