China : चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनंतर आता संरक्षणमंत्री ली शांगफूही (Li Shangfu) गायब झाले आहेत. यापूर्वी चिनी (China) लष्कराच्या शक्तिशाली रॉकेट फोर्सचा जनरलही बेपत्ता झाला होता. अमेरिकेचे जपानमधील राजदूत रेहम इमॅन्युएल यांनी चीनमधील वाढत्या राजकीय अस्थिरतेकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, चीनचे संरक्षण मंत्री गेल्या दोन आठवड्यांपासून दिसत नाहीत. ‘बेरोजगारीची ही शर्यत कोण जिंकणार? चीनचे तरुण की शी जिनपिंग यांचे मंत्रिमंडळ? चीनचे संरक्षण मंत्री दिसत नसताना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रिपोर्ट्सनुसार, चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू 29 ऑगस्ट 2023 पासून दिसले नाहीत. ली शांगफू यांनी चीन-आफ्रिका शांतता आणि सुरक्षा मंचाला संबोधित केले. या बैठकीपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री एका सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला गेले होते. रशियन नेत्यांसोबतच्या बैठकीदरम्यान ली शांगफू यांनी ‘चीनला घेरण्यासाठी तैवानचा वापर केल्याबद्दल’ अमेरिकेवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, यासाठीची कोणतीही योजना फसणार आहे.
शी जिनपिंग यांनी अनेक अधिकाऱ्यांना हटवले
चीनचे संरक्षण मंत्री बेपत्ता झाले असतानाच, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या सैन्यात एकता आणि स्थैर्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. चीनचे मंत्री ली यांची मार्च 2023 मध्ये संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जुलै महिन्यात शी जिनपिंग यांनी त्यांचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांना हटवले. किन गँग सुमारे दोन महिने बेपत्ता होते आणि त्यानंतर त्यांच्या जागी वांग यी यांना परराष्ट्र मंत्री बनवण्याची घोषणा करण्यात आली.
किन गँगला हटवल्यानंतर शी जिनपिंग यांनी रॉकेट फोर्सचे जनरल आणि जनरल लिऊ गुआंगबिन यांनाही बडतर्फ केले. या तिन्ही लोकांची थेट शी जिनपिंग यांच्या मंत्रिमंडळाने नियुक्ती केली होती. यानंतर जिनपिंग यांच्यावर बरीच टीका झाली होती. या तिन्ही लोकांना भ्रष्टाचारामुळे काढून टाकण्यात आल्याचे चीनवर लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या चीनचे राष्ट्राध्यक्ष देशाच्या आर्थिक स्थितीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. या मंत्र्यांच्या बेपत्ता झाल्यामुळे चीन आणि जिनपिंग यांच्या राजवटीवर संशय वाढत आहे.