Chhagan Bhujbal । राजकीय वर्तुळात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भूकंप येत असतात. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहेत. नुकतीच या दोन्ही राजकीय नेत्यांची भेट झाली.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकला जाताना पाहायला मिळत आहे. हे वातावरण शांत व्हावं या उद्देशाने आपण शरद पवारांची भेट घेतली आहे.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “गरीब दोन्ही समाजात आहेत. त्यात काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत. लग्नात जायचे नाही, हॉटेलात जायचे नाही, हे कधी थांबणार? त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. हे थांबले पाहिजे यासाठी मी पुढाकार घेतला आहे. शरद पवारांना अनुभव जास्त आहे, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
“राज्यात कटुता वाढत असून ती शांत राहिली पाहिजे. पेटवायला अक्कल लागत नाही. जुळवायला अक्कल लागते, जाळायला नाही. सर्वांनी एकत्र येवून शांतता राखली पाहिजे. राज्य शांत राहिले पाहिजे, त्यासाठी मी पुढाकार घेतला. मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे. कोणताही राजीनामा मागितला तरी मी देईल. राज्यात डोके फुटता कामा नये, यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार सगळे पुढे येत आहेत,” असा दावा छगन भुजबळ यांनी केला.