Champions Trophy 2025 : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयसीसीकडून चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
भारतीय माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवू इच्छित नाही आणि या स्पर्धेसाठी आगामी आयसीसीच्या बैठकीत या विषयावर आपले मत मांडेल. या बातम्या ऐकल्यानंतर पीसीबीची झोप उडाली असून बीसीसीआयला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पीसीबीने अशी धमकी दिली आहे की जर भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 च्या टी-20 विश्वचषकावरही बहिष्कार टाकला जाईल. या अहवालानुसार, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने मायदेशात आयोजित करण्यावर ठाम आहे कारण त्याला या स्पर्धेचे यजमान हक्क मिळाले आहेत. तो आपल्या भूमिकेपासून मागे हटणार नाही. जिओ टीव्ही उर्दूच्या वृत्तानुसार, यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर झुकण्यास तयार होणार नाही.
पुढील महिन्यात श्रीलंकेत आयसीसीची बैठक होणार आहे, ज्यामध्ये हे दोन्ही देश आपापली भूमिका स्पष्ट करतील. पीसीबी यावेळी आपल्या भूमिकेपासून मागे हटण्याच्या मनस्थितीत नाही. पीसीबीच्या वतीने अध्यक्ष मोहसीन नक्वी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेबाबत भारताने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मीडियामध्ये आलेल्या सर्व बातम्या सूत्रांवर आधारित आहेत. पण याआधीही, गेल्या वर्षी जेव्हा आशिया चषक स्पर्धा खेळण्याचा विचार आला तेव्हा त्याचे आयोजनही पाकिस्तानने केले होते परंतु भारताने येथे आपला संघ पाठवण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि त्यानंतर ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळली गेली. या स्पर्धेत भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले.