CAA News : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत (CAA) अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले.
यावेळी ते म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पाकिस्तानच्या छळाचा सामना करणारे निर्वासित आज आमच्या कुटुंबात सामील झाले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने CAA मंजूर करून लाखो निर्वासितांना न्याय आणि अधिकार दिले आहेत.
भारतीय नागरिकत्व मिळालेल्या मीरा बेन म्हणाल्या, मी 15 वर्षांपूर्वी भारतात आले होते. मुस्लिम समाजातील लोक मला तिथे त्रास देत असत. इथे आल्यानंतर मला जगण्याचा अर्थ कळला. आज मला माझे नागरिकत्व प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.
पाकिस्तानात मुली सुरक्षित नाहीत
बरखा अरोरा नावाच्या महिलेने सांगितले, मी पाकिस्तानातून आले आहे, मी भारतात 11 वर्षे घालवली आहेत. मुलींसाठी पाकिस्तानात राहणे सुरक्षित नव्हते. मला इथे ज्या सुविधा मिळतात त्या पाकिस्तानात मिळत नव्हत्या. चोरी, लुटमारीच्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. 15 दिवसांच्या प्रक्रियेत मला नागरिकत्व प्रमाणपत्र मिळाले, मला खूप आनंद झाला आहे.
नागरिकत्व प्रमाणपत्र मिळाल्याने खूप आनंद झाला
या दोघांशिवाय नागरिकत्व मिळालेल्या रावशीने सांगितले की, मी 1995 मध्ये भारतात आलो, मुस्लिम लोकांमुळे तेथे खूप त्रास झाला. आम्ही चौघे भाऊ होतो, मग आम्ही चौघांनी सीमा पार करून भारतात यायचे ठरवले. इथे यायला काही अडचण नव्हती, आज मला नागरिकत्व प्रमाणपत्र मिळत आहे. यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो.
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली
अहमदाबादमध्ये आयोजित नागरिकत्व कार्यक्रमात अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की त्यांच्या प्रदीर्घ राजवटीत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील लाखो हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध निर्वासितांना न्याय मिळाला नाही. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली. फाळणीच्या वेळी हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख यांना भारतीय नागरिकत्व देण्याचे वचन दिले होते. काही काळानंतर काँग्रेसला फाळणीच्या वेळी निर्वासितांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला. काँग्रेस व्होट बँक आणि मुस्लिम तुष्टीकरणामुळे हिंदूंना भारतात नागरिकत्व मिळाले नाही.