मुंबई : ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील देखील IPO आणण्याची तयारी करत आहे. कंपनीचे IPO द्वारे 1 हजार 250 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी कंपनीने सेबी (स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कडे अर्ज दाखल केला आहे. या IPO साठी दाखल केलेल्या DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) नुसार 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त इक्विटी समभागांच्या विक्रीची ऑफर असेल, ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान भागधारक त्यांचे आंशिक भागभांडवल विकतील.
या ऑफर फॉर सेलमध्ये, SoftBank सोबत आणखी 7 भागधारक त्यांचे आंशिक हिस्सेदारी विकतील. यामध्ये Sequoia Capital आणि Ontario Teachers Pension Plan Board या भागधारकांच्या नावांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या ८ टक्के भागभांडवल विकले जाईल. स्नॅपडीलचे 71 भागधारक आहेत, ज्यात 35.41 टक्क्यांसह सॉफ्टबँकचा सर्वात मोठा हिस्सा आहे. कंपनीचे संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल या दोघांची एकूण 20.28 टक्के हिस्सेदारी आहे. या दोन्ही संस्थापकांपैकी कोणीही त्यांचा हिस्सा विकणार नाही.
स्नॅपडील भारतातील लहान शहरांवर लक्ष केंद्रीत करते. त्यातील 86 टक्क्यांहून अधिक ऑर्डर मेट्रो शहरा बाहेर आहेत. DRHP नुसार, स्नॅपडीलच्या नेट मर्चेंडाइज्ड व्हॅल्यूमध्ये गेल्या दोन तिमाहीत 82.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ते 205 कोटींवरून 374 कोटी झाले आहे. या IPO पूर्वी, Snapdeal च्या पूर्ण मालकीची उपकंपनी Unicommerce ने सॉफ्ट बँकेकडून सुमारे 30 टक्के हिस्सेदारी घेण्यासाठी गुंतवणूक प्राप्त केली आहे.
दरम्यान, जगात अनेक देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने थैमान घातले आहे. हा व्हेरिएंट भारतात सुद्धा पोहोचला आहे. दिवसेंदिवस धोका वाढत असताना जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. देशातील शेअर बाजाारावरही परिणाम झाला आहे. या काळात पेटीएम, स्टार हेल्थ सारख्या कंपन्यांना फटका बसला आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनेक कंपन्यांनी आयपीओ आणणे टाळले आहे. मात्र, दुसरीकडे अशाही परिस्थितीत काही कंपन्या मात्र आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत.
ऑटो सेक्टरची ‘ही’ कंपनी आणतेय 800 कोटींचा IPO; तपासून पहा कमावण्याची संधी