मुंबई : दुचाकीनंतर आता चारचाकी वाहन क्षेत्रात आणखी एक दिग्गज कंपनीची एन्ट्री होणार आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांच्या नाही तर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात ही कंपनी दमदार एन्ट्री घेणार आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनीच तसे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले, की कंपनी लवकरच इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. सोशल मीडियावर माहिती देताना अग्रवाल यांनी लिहिले, की ज्या व्यक्तीने Tata Nexon EV आणि Ola S1 e-Scouter खरेदी केली आहे, तो पुढच्या वेळी Ola इलेक्ट्रिक कार खरेदी करेल.
कंपनीने गेल्या वर्षी ‘ओला एस 1’ आणि ‘ओला एस 1 प्रो’ या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या होत्या. या स्कूटरना चांगला प्रतिसाद मिळाला. आता, कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ओलाच्या सीईओने यापूर्वी संकेत दिले होते, की कंपनी 2023 पर्यंत आपली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अग्रवाल यांनी असेही सांगितले, की ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये येईल आणि या प्रकल्पाला जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप समर्थन मिळेल. देशाला जागतिक इलेक्ट्रिक वाहन हब बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे यावरही त्यांनी जोर दिला. मात्र, ओलाने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कारबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
ओला इलेक्ट्रिक कार तामिळनाडूतील ईव्ही प्लांटमध्ये तयार केली जाण्याची शक्यता आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा कमी खर्च आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान देणाऱ्या वाहनांमुळे वाढती चिंता यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.