मुंबई : सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा आणि कोविड-19 महामारीमुळे जगभरातील ऑटो कंपन्यांना पुरवठा साखळीतील समस्यांचा फटका बसला आहे. यामुळे भारतासह जगभरातील ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहनासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. पण जपानमधील ग्राहकांना एक वाहन देण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागू शकते. विशेष म्हणजे, याचे कारण ना सेमीकंडक्टर चिप्सची कमतरता आहे.. ना पुरवठा साखळीची समस्या. जगातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी टोयोटाने जपानमधील आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, कंपनीच्या नवीन लँड क्रूझर एसयूव्हीच्या (Toyota Land Cruiser SUV) वितरणासाठी त्यांना चार वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. कंपनीचे म्हणणे आहे की याचे कारण जागतिक चिपची कमतरता किंवा पुरवठा साखळी संकट नाही. मात्र, डिलिव्हरीला उशीर होण्यामागचे कारण कंपनीने उघड केलेले नाही.
टोयोटाचे म्हणणे आहे की, देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये कंपनी जपानमधील त्यांच्या 11 प्लांटमधील उत्पादनात कपात करत आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, लँड क्रूझर केवळ जपानमध्येच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहे. वितरणास बराच वेळ लागू शकतो याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्हीही ऑर्डर केल्यास, डिलिव्हरी मिळण्यासाठी तुम्हाला चार वर्षे लागू शकतात. आम्ही वितरण वेळ कमी करण्याचा प्रयत्न करत राहू. लँड क्रूझर 1951 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि ती टोयोटाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत कंपनीने 1.06 कोटी वाहनांची विक्री केली आहे. अलीकडच्या काळात कंपनीला वाहनांच्या उत्पादनात कपात करावी लागली आहे. गेल्या महिन्यात टोयोटाने जपानमधील काही प्लांटमधील उत्पादन कपातीची घोषणा केली होती. याचे कारण कंपनीला पुरवठा साखळी समस्या भेडसावत आहे.
कंपनीने सांगितले की, साथीच्या रोगामुळे दक्षिण पूर्व आशियातील त्याच्या घटक कारखान्यांमधील उत्पादनावर परिणाम झाला आहे. याचा विशेषतः लँड क्रूझर आणि लेक्ससच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने चिपच्या तुटवड्यामुळे सप्टेंबरपर्यंत जागतिक उत्पादन 40 टक्क्यांनी कमी करणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी टोकियो शेअर बाजारात कंपनीचा शेअर 2.48 टक्क्यांनी घसरून बंद झाला. जपानमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे वाढली आहेत.