नवी दिल्ली : मोदी सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाले. त्यानंतर आता राजधानीतील केजरीवाल सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे शहरात आता पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 30 टक्क्यांवरुन 19.40 टक्के केला आहे. त्यामुळे शहरात पेट्रोलची किंमत आता 103.97 रुपयांवरुन 95.97 रुपयांवर पोहोचली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कपात करण्याच्या निर्णयास आज दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली. याआधी राजस्थान, छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांनी व्हॅट कपात केली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजधानी दिल्ली शहरात आता पेट्रोल शंभरच्या आत आले आहे.
देशात अनेक राज्यांनी व्हॅट कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने अद्याप नागरिकांना दिलासा दिलेला नाही. राज्य सरकारने अजूनही इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी केलेला नाही. ज्यावेळी केंद्र सरकार कर कपात करत नव्हते त्यावेळी राज्य सरकारचे मंत्री व नेते केंद्र सरकारवर जोरदार टीका करत होते. त्यानंतर केंद्र सरकारने काही प्रमाणात कर कमी केले मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने व्हॅट कपात केली नाही. त्यामुळे राज्यात अनेक शहरात पेट्रोल 110 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
सध्या मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर या दराने मिळत आहे. पुण्यात पेट्रोल 109.31 रुपये आणि डिझेल 92.31 रुपयांना मिळत आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोल 111.64 रुपये आणि डिझेल 95.79 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच शहरात अशीच परिस्थिती आहे.
पेट्रोलचे सोडा.. अन स्कॉच प्या की जोरात.. महाराष्ट्र सरकार मेहरबान.. 50 टक्के झालीय करमुक्ती..!
मोदी सरकारनंतर या राज्यांनीही कमी केले पेट्रोल-डिझेलचे दर, महाराष्ट्र सरकार घेणार का निर्णय..?