नवी दिल्ली : युक्रेनबाबत युरोप आणि रशिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इशारा दिला आहे की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा विध्वंस होईल. युक्रेन फक्त एक नापीक जमीन होऊन राहील.
बोरिस जॉन्सन मंगळवारी एका समारंभात म्हणाले, की ‘युक्रेनच्या लोकांना त्यांच्या देशाचे रक्षण करण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे. मला विश्वास आहे, की युक्रेनियन लोक एकजुटीने कोणत्याही आक्रमणास विरोध करतील. मात्र, या विध्वंसाचा कोणालाच फायदा होणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युक्रेनवर आक्रमण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
रशियन सैन्याने फेब्रुवारीमध्ये सागरी लष्करी सराव करण्याची घोषणा केल्यानंतर जॉन्सनचे हे वक्तव्य आले आहे. संभाव्य रशियन आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी, ब्रिटनने युक्रेनला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक टँकविरोधी क्षेपणास्त्रे आणि अँग्लो-स्वीडिश अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे दिली आहेत. नाटोच्या लष्करी तज्ज्ञांच्या मते, रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे 8,000 रणगाडे तैनात केले आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवर 36 इस्कंदर क्षेपणास्त्र प्रक्षेपक देखील तैनात केले आहेत.
त्याच वेळी, संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी युक्रेन आणि रशियामधील तणाव कमी करण्यासाठी राजकीय संवाद सुरू करण्याची विनंती केली आहे. युनायटेड नेशन्सचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक म्हणाले, की “युनायटेड नेशन्सला दोन्ही देशांमधील प्रश्न युद्धाऐवजी संवादाने सोडवायचे आहेत. आम्ही सर्व बाजूंना युद्धाची परिस्थिती संपवण्यासाठी आणि सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन करतो.