Russia Ukraine War : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी बुधवारी देशाच्या स्वातंत्र्यदिनी युक्रेनला (Ukraine) अचानक भेट दिली आणि रशियासोबत (Russia) सुरू असलेल्या संघर्षासाठी तब्बल 5.4 कोटी पाउंड आणखी देण्याचे जाहीर केले. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून जॉन्सन यांची युक्रेनची राजधानी कीवची ही शेवटची भेट होती. जॉन्सन पुढील महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असून नवीन पंतप्रधान निवडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या “क्रूर आणि बेकायदेशीर आक्रमणापासून युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणार्या युक्रेनला ब्रिटन सतत पाठिंबा देत राहिल. जॉन्सनने घोषित केले की युक्रेन जिंकू शकतो आणि जिंकेल. जॉन्सन म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांपासून, ब्रिटन युक्रेनच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, या सार्वभौम देशाला या बेकायदेशीर आक्रमणकर्त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देत आहे.” आजचे समर्थन पॅकेज युक्रेनच्या सशस्त्र दलांना रशियन सैन्याला मागे ढकलण्यात आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास मदत करण्याच्या क्षमतेत आणखी एक वाढ देईल. जॉन्सन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांचीही भेट घेतली.
युरोपमधील देशांनी बुधवारी युक्रेनला पाठिंबा देण्याचे वचन दिले. युरोपीय देशांच्या नेत्यांनी युक्रेनच्या लोकांच्या त्याग आणि धैर्याला सलाम करत युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आणि हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध केला. युक्रेनने 1991 मध्ये सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केले. ब्रिटननेही युक्रेनबरोबर असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनीच जोरदार हमले सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा अजूनही निकाल लागलेला नाही.