नवी दिल्ली : भारतीय नागरिकांसाठी ब्रिटेन सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 3000 भारतीय तरुणांना यूकेमध्ये काम करण्यासाठी व्हिसा मिळणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी भारतातील तरुण व्यावसायिकांना दरवर्षी यूकेमध्ये काम करण्यासाठी तीन हजार व्हिसा देण्यास मंजुरी दिली. अशा योजनेचा लाभ घेणारा भारत हा पहिला देश असल्याचे यूके सरकारने म्हटले आहे. पीएम मोदी आणि ऋषी सुनक यांच्या भेटीच्या काही तासांनंतरच हा निर्णय झाला आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालय, डाउनिंग स्ट्रीटने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स स्कीमची आज खात्री झाली आहे. ज्यामध्ये 18-30 वयोगटातील 3,000 पदवी-शिक्षित भारतीय नागरिकांना व्हिसा मिळून यूकेमध्ये येण्याची आणि काम करण्याची ऑफर देण्यात आली आहे. ब्रिटन दरवर्षी 18-30 वयोगटातील 3000 तरुण व्यावसायिकांना म्हणजेच पदवीधारक भारतीयांना ब्रिटनमध्ये दोन वर्षांसाठी काम करण्याची ऑफर देईल. ही योजना पुढील वर्षी 2023 च्या सुरुवातीला सुरू होईल आणि ती परस्पर आधारावर असेल.
डाउनिंग स्ट्रीटची ही घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा मंगळवारी इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर काही तासांनी यूकेने भारतीय तरुणांना व्हिसा देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. भारतीय वंशाच्या पहिल्या ब्रिटिश पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक होती.
यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या डाऊनिंग स्ट्रीट येथील कार्यालयाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर कोणत्याही देशापेक्षा यूकेचे भारताबरोबर आधिक बळकट संबंध आहेत. यूकेमधील जवळपास एक चतुर्थांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भारतातील आहेत आणि भारतीय गुंतवणुकीमुळे यूकेमध्ये 95,000 रोजगार निर्माण होतात. यूके सरकारने कार्यक्रमाचा शुभारंभ यूके-भारत संबंधांसाठी एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे वर्णन केले.
दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, नवे पंतप्रधान ऋषी सुनक संतुलित करारासाठी वचनबद्ध आहेत आणि या दिशेने भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करारावर (FTA) सखोल चर्चा सुरू आहे. सुनक यांनी गेल्या आठवड्यात यूकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी एफटीएसाठी त्यांची वचनबद्धता व्यक्त केली. ब्रिटनचे पंतप्रधान कार्यालय ’10 डाउनिंग स्ट्रीट’ ने सांगितले की, दोन्ही बाजूंना फायदेशीर असलेल्या संतुलित व्यापार करारावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे कोणतीही अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. एका प्रवक्त्याने सांगितले की दोन्ही बाजू यासाठी वचनबद्ध आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या नेतृत्वात वाटाघाटी सुरू आहेत.
- हे सुद्धा वाचा : Britain Political Crisis : ब्रिटेनच्या राजकारणात पुन्हा खळबळ..! ‘त्या’ प्रस्तावामुळे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची शक्यता..
- Britain Heat Wave : इंग्रजांच्या देशात पुन्हा आलेय ‘ते’ संकट.. लोकांना मिळाला ‘हा’ धोक्याचा इशारा..