Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BLOG : “सोडणं” तसं सोप्पं.. पण नाही सोडलं तर होतात असेही दुष्परिणाम

“सोडणं” तसं किती सोप्पं काम; पण करायला गेलं की जमत नाही. अगदी जन्मापासूनच प्रत्येकाला सोडणं काही जमत नाही. प्रत्येक जण येतोच तोमुळी मुठ्या आवळून, मालीश करताना अंघोळ करताना मूठ सोड म्हणलं तरी भोकाड पसरतात. आणि आयुष्यभरही बरेच जण तेच करतात. गमतीची गोष्ट सोडा पण खरंच एवढं अवघड असतं का हो सोडणं? कित्येक वेळा कित्येक जण उपदेश करतात एवढंच काय दिवसातून शंभर वेळातरी फेसबुक, व्हाटस्ॲपवर आपण कित्येक ज्ञानामृताचे घडेच्या घडे ओतून घेतो पण आचरणात आणतो का? कितीतरी प्रवचनकार, संत, मानसोपचार तज्ञ सांगतात की, लोकांवरचा राग सोडा, सलोखा धरा, मोकळेपणाने एकमेकांशी बोला ; पण होतं मात्र सगळं उलटं!! आपण बोलणं सोडतो, अबोला धरतो आणि एकमेकांबद्दल राग धरुन बसतो. ह्या अशा चुकीच्या धरायच्या आणि सोडायच्या सवयींचा परिणाम मात्र आपल्या मनावर आणि शरीरावरही दिसून येतो.

Advertisement

लेखिका : हिमांगी हडवळे – नवले (Email : himanginavale@gmail.com ; Facebook Profile : https://www.facebook.com/himangi.navale)

Advertisement

माणसाचा मेंदूही एक अजब रसायन आहे. त्याला मात्र बरोबर कळतं कधी काय सोडायचं ते. जेव्हा आपण वाईट गोष्टींचा सारखा विचार करत राहतो, एखाद्याबद्दल सतत चुकीचा विचार, ईर्षा किंवा राग धरुन बसतो किंवा सततचा अतिविचार करतो तेव्हा तसेच हार्मोन्स मेंदू सोडायला सुरुवात करतो व त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. ॲसिडिटी, छातीतली जळजळ, सततची डोकेदुखी, वाढलेली धडधड ही त्याचीच लक्षणे आहेत. मी काही यांतील तज्ञ नाही पण बऱ्याच लेखातून, तसेच काही डॅाक्टर लोकांच्या बोलण्यातून काही आजारांची कारणे समजली. त्यांच्या मते कॅन्सरच्या गाठी होण्याचे कारणही मनात साठलेली नकारात्मकता आहे. ह्रदयविकाराचे कारणही तेच सांगितले आहे; मनातले नकारत्मक विचार, दु:ख कुठेही व्यक्त न करता ते मनात तसेच साठवत राहिलं तर शरीरही त्याला प्रतिसाद म्हणून “क्लॅाट्स” बनवायला चालू करते. मग तो क्लॅाट बाकीच्या नकारत्मक गोष्टींचा आकर्षण बिंदू बनतो आणि दिवसेंदिवस वाढत जातो. जर तो मेंदूच्या वाहिनीत गेला  त्याचा अटॅक येतो आणि जर ह्रदयाच्या वाहिनीत गेला तर हार्टअटॅक येतो.

Loading...
Advertisement

असंच काहीसं  मधुमेह असणाऱ्यांमध्ये होतं. फार कमी लोकांना अनुवंशिकतेने मधुमेह येतो. पण यातही गंमत आहे ती अशी की अनुवंशिकतेने मधुमेह येण्याआधी अनुवंशिकतेने स्वभाव आलेला असतो जो खरंतर मधुमेहास कारणीभूत ठरतो. नाहीतर चार मुलांपैकी दोघांनाच कसा काय मधुमेह होतो. याला कारणीभूत स्वभाव किंवा अगदीच शास्त्रीय भाषेत सांगायचं तर “जिन्स किंवा जनुके” !! भोवतालच्या परिस्थितीचा मनावर जास्त ताण घेतला आणि काय धरायचं काय सोडायचं विसरलं की शरीरही इन्सुलिन बनवणं सोडून देतो आणि मग आपल्याला दवाखान्याची वाट धरावी लागते. माणसाचं जसंजसं वय वाढत जातं ना तसंतसं त्याच मन कठोर होऊ लागतं व त्याचबरोबर त्याच्या धमन्यांची ताठरताही वाढत जाते. स्वभावतील ताठरता आणि धमन्यांतील ताठरता मग हळवेपण सहन करु शकत नाहीत व याचा परिणाम म्हणून धमन्यांवरचा वाढलेला ताण तिलाच फोडून टाकतो यालाच “हिमोरेज” असंही म्हणतात.

Advertisement

हे सर्व परिणाम पाहिल्यावर मनात विचार येतच असेल ना की यावर उपाय नसेल का? तर याच उत्तर आहे “हो” आणि तोही तुमच्याकडेच आहे. सर्व प्रथम माफ करायला शिका दुसऱ्यालाही आणि स्वत:लाही!! अट्टाहास करणं सोडून द्या म्हणजेच हल्लीच्या भाषेत “चिल पिल घ्या”!! आणि चिल पिल बरोबर थोडंसं “समजूतदार” पणाचं औषध घ्या; त्याने बरेच प्रश्न सुटतात. या सर्वांबरोबर मी प्रामुख्याने महिलांसाठी सांगेल की, स्वत:ला व्यस्त ठेवा. रिकाम डोकं सैतानाचे घर असते त्यामुळे ते घर मोकळे न ठेवता ते तुमच्या वेगवेगळ्या छंदांनी सजवा. विज्ञान सांगते की, जेव्हा तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट शिकायला जाता तुमचा मेंदू नवीन पेशी तयार करतो आणि जर तुम्ही कित्येक वर्षे नवीन काहीही शिकला नाहीत तर मग मेंदूतल्या त्या विशिष्ट पेशी मरु लागतात. म्हणूनच सतत स्वत:ला काहीतरी नवीन करण्यात व्यस्त ठेवा. त्यासाठी छंदच जोपासला पाहिजे असं नाही; अगदी नेहमी साधं फोडणीचं वरण करत असाल तर एखाद्या वेळी पंचरत्न दाल करा, पहा काय फरक पडतो ते!! याचचं एक उत्तम उदाहरण सांगते माझ्या एका अवघ्या तीसवर्षाच्या  मैत्रिणीला हाडांचा आजार आहे तिला शॅाक घ्यावे लागतात पण जेव्हा पासून तिने स्वत:ला वेगवेगळ्या नवीन कामात, छंदांत स्वत:ला रमवून घेतलं तेव्हापासून तिचं शॅाक घेणं बंद झालयं. याचा अर्थ तिच्याबरोबरच तिच्या शरीरालाही योग्यवेळी कळलं काय धरावं आणि काय सोडावं ते!! एकूण काय तर  कधीकधी थोडासा बदल म्हणून काही सवयी सोडा, काही रुसवे फुगवे सोडा, काही अट्टाहास सोडा आणि पहा तुमच्यातलं दुखणं, तुमच्यातील नकारत्मकता तुम्हांला कशी पटकन सोडून जाईल ती. काय मग जमेल ना पुढेसोडणं “?

Advertisement
Advertisement

3 Comments
 1. Ms Poonam says

  Superb write up 👍🏻
  surely I will try to leave it 😊
  Mandatory in modern era too 😊
  Thanks for such beautiful explanation

  1. Editor, Krushirang says

   Thanks

 2. Vikas Yevale says

  बदल काळानुसार गरजेचा आहे सोडता ही यावं पण काय हे ही कळायला हवं.☺️🌸सुंदर लिहलय ताई

Leave a Reply