सध्या महाराष्ट्र राज्याच्या केंद्रस्थानी आहेत “मी पुन्हा येईन”वाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इशाऱ्याने (चर्चा तर अशीच आहे म्हणून) बंडखोर बनलेले मंत्री एकनाथ शिंदे. हे दोघेजण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जोडी म्हणून सत्तासोपान चढणार की अजित पवार-फडणवीस यांच्यासारखा यांचाही बाजार उठणार याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले आहे. भाजपला यातून काहीही झाले किंवा नाही झाले तरी फायदाच आहे. तोटा झालाय तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शब्द पळणाऱ्यांचा…
होय, यासाठी अगोदर माझे वैयक्तिक उदाहरण सांगतो. मग अखेरीस पुन्हा या महाभारताकडे येऊच. तर, गोष्ट आहे २०१२ ची. त्यावेळी मी ग्रामपंचायत निवडणूक लढलो होतो. त्यात जिंकलो आणि नंतर हरलोसुद्धा. होय, दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडल्या. कारण भारतीय समाजाच्या लेखी मी बाळबोध होतो. तर आता मूळ मुद्द्यावर येऊ. वास्तव सांगतो. मग तुम्हीच काय तो अर्थ काढा आणि प्रतिक्रिया लिहा.
निवडणुकीच्या अगोदरच वर्षभर आम्ही तयारी सुरू केली. यासाठी गावातून राजकीयदृष्ट्या हद्दपार झालेल्या एका कुटुंबातील “मित्रा”ला आम्हीच नेतृत्व दिले. तो आणि आम्ही गावाच्या विकासाचे स्वप्नरंजन करून कामाला लागलो. मित्राचे भाऊबंद आणि माझेही भाऊबंद अन् इतर जिवलग एक झालो. लढायला सज्ज झालो आणि गावात काय विकासकामे करता येतील यासाठी रोज चर्चा करायला लागलो. निवडणूक जवळ आली तसे “मित्रा”चे रंग दिसायला लागले. काहींना म्हटले, “अरे, आपण चुकतोय. वेगळी चूल मांडू..”
पण माझ्यापेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीचा जास्त अनुभव असलेल्या मित्रमंडळींनी “सुरळीत होईल सगळे.. आपण विकासाच्या लाईनवर आणुया सगळे..” असा विश्वास दिला. मीही अजिबात विचार केला नाही की, फसवणूक करणारा कधीच प्रामाणिक होऊ शकत नाही. कारण त्याला तोही काही वाल्मीक नाही. अन् इथेच मी चक्रव्यूहात अडकलो. निवडणुकीत मग दोन विरुद्ध पार्ट्या एक झाल्या आणि “बिनविरोध” या गोंडस नावाखाली लोकशाहीचा गळा ग्रामस्थांनी घोटला. कारण त्यात बड्या धेंडांनी (माझ्यासहित सगळ्यांना जागा मिळाल्या) जागा वाटून गावाला खायचे ठरवले. मी त्या लोकशाही प्रक्रियेच्या विरुद्ध असलेल्या गोष्टीत एकटा पडलो. बैठकीला गेलो नाही आणि सिनेमा पाहत बसलो. बिनविरोध याबाबत बैठक चालू असतानाच मला दुसरा पॅनल उभा राहत असल्याचा फोन आला आणि गावाची लोकशाही शाबीत असल्याने मलाही हायसे वाटले.
यथावकाश दुसरा पॅनल आणि आमच्या “मित्रा”च्या नेतृत्वाखालील पॅनल एकमेकांशी भिडले. निवडणूक रंगतदार झाली. आमच्याच आपापल्या आर्थिक जीवावर आमचा मित्रत्वाचा पॅनल ४-३ फरकाने जिंकला आणि मग आणखी पळापळ झाली.
“मित्रा”ने मग आणखी रंग दाखवायला सुरुवात झाली. सरपंच आणि उपसरपंच याचा बाजार झाला. महिला आरक्षित सरपंच असल्याने मी उपसरपंच या पदावर दावा केला. बैठकीत मी माझा शब्द पाळला. विरुद्ध पॅनल मला पद देत असतानाही मी शब्द पाळण्यासाठी म्हणून माझेच भाऊबंद आणि अनेक जिवाभावाचे मित्र यांच्याकडे दुर्लक्ष केले. “ते म्हणायचे अरे राजकारणात नैतिकता आणि दिलेला शब्द पाळणे महत्त्वाचे नसते. मिळत आहे पद तर घेऊन टाक…” पण मी काही ऐकले नाही. मग त्यांच्या दृष्टीने मी “शब्द पाळणारा आणि राजकारण न कळणारा वेडा माणूस” झालो. इकडे “मित्रां”नी त्यांचा शब्द पाळला नाही. आणि मग मी गावाच्या लेखी आणखी जास्त “सत्यवादी वेडपट” झालो. पुढे अडीच वर्षांचा शब्द पाळण्यासाठी कोणीही जागला नाही. सोसायटी निवडणूक आली. “मित्रमंडळी” पॅनल एक राहिला. आम्ही सोसायटीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला. पण तरीही सोसायटीत आमचा दणक्यात पराभव झाला. आणि अशा पद्धतीने गावातील कुरघोडीच्या राजकारणात नैतिकता आणि भ्रष्टाचार हे मुद्दे कुचकामी असल्याचे भान मला आले.
याच अनुभवाच्या शिदोरीवर मी दीडेक वर्षे विचार केला. राजकारणातील विजयाच्या गणिताचे मुद्दे कागदावर आणले. अनेकांशी चर्चा केली. अखेर मग यावरूनच पॉलिटिकल पीआर (राजकीय जनसंपर्क) या विषयात मी राज्यस्तरीय सल्लागार झालो. अनेकांना पंचायत समितीतून थेट आमदार करण्यात आणि आहे त्यांना आमदारकी टिकवण्यात किंवा पुन्हा मिळवण्यात सल्लागार म्हणून काम केले. खासदारकीसाठी काहींना सर्वेक्षण करून सहकार्य केले. अशा पद्धतीने गावाने मला बेरकी आणि विजयी होण्याच्या राजकारणाचे धडे दिले. आणि मीही मग गाव हे आपले कार्यक्षेत्र नाही हे समजून घेऊन देशभरात कामाला लागलो..
तर, मुद्दा आताच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा आहे. तर, फडणवीस साहेबांनी पुन्हा यायला कोणाची काहीही हरकत नसावी. कारण तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिंदे साहेबांनी पक्ष सोडून जाणे हेही काही दिव्य कार्य नाही. त्यांनी आणि भाजपने यासाठी खोट्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करणे हेही काही महान चूक नाही. कारण आपला समाज तसाच झाला आहे. दिलेला शब्द न पाळणे, समाजाची फसवणूक करणे, पैशांना मुजरा करणे, सत्तेचा गैरवापर करणे, समाजामध्ये फूट पाडणे, जात-धर्म आणि अर्थकारण यावरून पळापळ करणे हेच या भारतीय समाजाचे वास्तव आहे. मग त्याला शिंदे-फडणवीस साहेब तरी अपवाद कसे असतील…??
- सचिन मोहन चोभे (अहमदनगर)