BJP : उत्तराखंडमधील मंत्रिमंडळ विस्तारात (Uttarakhand Cabinet Expansion) मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, गेल्या वर्षी केंद्रात झालेल्या मोठ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या धर्तीवर राज्यातही मोठा विस्तार केला जाऊ शकतो. ज्यामध्ये अनेक दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना प्रवेश मिळू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) नेतत्व मंत्रिमंडळ विस्तार योजनेला अंतिम रूप देण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) आणि प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्याकडूनही स्वतंत्र प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सरकारच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणि अलीकडच्या घटनांमुळे डागाळलेली प्रतिमा बदलण्यासाठी मोठे बदल होऊ शकतात. सरकारबाबत जनतेला चांगले संकेत देण्यासाठी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात ज्या प्रकारे अनेक मोठे चेहरे बदलले गेले, त्याचप्रकारचे उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) पाहायला मिळेल. मंत्र्यांची तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यात एकूण 12 मंत्री केले जाऊ शकतात, तर सध्या फक्त नऊ आहेत. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पुन्हा विजयी होण्याचे उद्दीष्ट असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात जातीय समीकरणे जोपासणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने पक्ष नेतृत्वाचे नियोजन सुरू आहे. आता या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळते आणि कुणाला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यावरून भविष्यातील राजकारणाची दिशाही ठरणार आहे.