मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पार्टीच्या अडचणी जास्त वाढल्या आहेत. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. त्याचाच अनुभव सध्या हा पक्ष घेत आहे. 0अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर नाराज असलेले त्यांचे काका शिवपाल यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यते दरम्यान एक नवीन बातमी आली आहे. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवपाल यादव यांच्याबाबत राजकीय वर्तुळात बोलले जात आहे की, भाजप त्यांना विधानसभेचे उपसभापती बनवू शकते. मात्र, शिवपाल हे पद स्वीकारण्यास तयार आहेत का, हाही मोठा प्रश्न आहे.
शिवपाल यादव यांना भाजप हे पद देऊ शकते, अशी चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. असे खरेच घडले तर शिवपाल त्यांचे पुतणे आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत. पीएसपी प्रमुख शिवपाल यादव इटावा जिल्ह्यातील जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नेहमीप्रमाणे यावेळीही शिवपाल सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल घेऊन निवडून आले आहेत. 10 मार्च रोजी झालेल्या मतमोजणीत समाजवादी आघाडी सत्तेपर्यंत पोहोचली नाही, तेव्हा शिवपाल यादव यांनी त्यांचे पुतणे अखिलेश यादव यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांचे अखिलेश यादव यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे.
शिवपाल यादव सध्या ज्या पद्धतीने वर्तणूक करत आहेत त्यावरुन ते भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. मात्र, अद्याप आधिकृत काहीही नाही. यादव राज्यसभेवर पाठवून मुलगा आदित्य यादव यांना त्यांच्या जसवंतनगर येथील पोटनिवडणुकीत उतरवल्याचीही चर्चा आहे. राज्यसभेशिवाय उपसभापती करण्याचा पर्याय भाजप रणनीतीकारांकडे असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. विधानसभेत यावेळी अखिलेश यादव यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक वृत्तीचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत शिवपाल यांना विधानसभेच्या उपसभापतीपदी बसवून भाजप सपा प्रमुखांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करील असे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये राजकीय भूकंप: शिवपाल यादव घेणार मोठा निर्णय; अखिलेशच्या अडचणीत वाढ