BJP Meeting । राजकीय हालचाली वाढल्या! भाजप लढवणार स्वबळावर निवडणुक? जाणून घ्या

BJP Meeting । राज्यात नुकत्याच लोकसभा आणि विधान परिषद निवडणुका पार पडल्या. लोकसभेवेळी राज्यात महायुतीला महाविकास आघाडीकडून मोठा पराभव सहन करावा लागला होता. पण विधानपरिषदेला महायुतीने जोरदार कमबॅक केले. अशातच आता राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीच्या बैठकांची मालिका सुरू आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रात भाजपची मोठी बैठक होणार आहे, अशा बातम्या समोर येत आहेत.

माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजपची मोठी बैठक होणार असून बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी, सहप्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव उपस्थित राहतील. या बैठकीत जागावाटपाबाबत तसेच निवडणुकीच्या तयारीची चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या अगोदर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी मुंबईत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. यावेळी महाराष्ट्र विधानसभा आणि बीएमसी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी महायुतीला फक्त 17 जागी विजय मिळाला होता. यामध्ये भाजपची 23 खासदारांवरून 9 खासदारांवर घसरण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा जिंकता आली होती.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत 30 जगांवर विजय मिळवला होता. यात काँग्रेसने सर्वात जास्त 13 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेने 9 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला होता.

Leave a Comment