लखनऊ : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर या राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोर-प्रत्यारोप करत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पाकिस्ताननेही एन्ट्री घेतली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजपने अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते संबित पात्रा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आज माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची एका महत्त्वाच्या वृत्तपत्रात मुलाखत वाचली, ज्यात त्यांनी पाकिस्तान हा भारताचा खरा शत्रू नसून मतांच्या राजकारणासाठी भाजप पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करतो, असे म्हटले आहे. हे विधान अत्यंत अयोग्य असून यासाठी त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. अखिलेश पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. ते पाकिस्तानला भारताचा खरा शत्रू मानत नाही आणि भारतीय जनता पक्ष केवळ मतांच्या राजकारणामुळे पाकिस्तानला शत्रू मानतो, असे त्यांचे म्हणणे आहे. हे विधान केवळ दु:खद आणि चिंताजनक आहे.
भाजप नेते म्हणाले की, आज मला अखिलेश यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. काश्मीरचे लोक आमचे बांधव नाहीत का, ज्यांवर पाकिस्तानकडून दररोज गोळीबार होतो आणि पाकिस्तानने पाठवलेल्या दहशतवाद्यांकडून नि:शस्त्र आणि निष्पाप लोक मारले जातात. त्यांचे जीवन हे जीवन नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 10 फेब्रुवारीला तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्चला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.