नवी दिल्ली : पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपने मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीसाठी पंजाब NDA आघाडीमधील जागा वाटपाचा आज अंतिम निर्णय घेण्यात आला. पंजाब निवडणुकीत यावेळी भाजपने माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (PLC) आणि सुखदेव सिंग ढिंढसा यांच्या पक्षाबरोबर युती केली आहे. सोमवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांमधील जागावाटपाची मोठी माहिती दिली.
पंजाबमध्ये भाजप आणि अमरिंदर सिंग यांच्या पक्षातील जागांवर सोमवारी अंतिम निर्णय घेण्यात आला. पंजाब निवडणुकीत भाजप 65 जागांवर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष लोक काँग्रेस पार्टी 35 आणि संयुक्त अकाली दल 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजप अध्यक्ष म्हणाले की, पंजाबमध्ये सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. पंजाब हे सीमावर्ती राज्य असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे येथील सुरेक्षचा मुद्दाही अत्यंत महत्वाचा आहे, असे भाजप अध्यक्ष नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या पक्षाच्या 22 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पटियाला या शहरातून कॅप्टन अमरिंदर सिंग हे स्वतः निवडणूक लढणार आहेत. 22 उमेदवारांपैकी 2 माढा, 3 दाओबा आणि 17 मालवा विभागातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसात जाहीर होईल, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या राज्यातील निवडणुकीत आम आदमी पार्टीने एन्ट्री घेतली आहे. तसेच त्यांनी येथे मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही घोषित केला आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पंजाब नंतर गोव्यातही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर; ‘त्या’ राजकारणात ‘आम आदमी’ ने घेतलीय आघाडी