BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची (BJP Candidate List) दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. तसेच या यादीत अनेक दिग्गज नेते आणि केंद्रातील मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर काही जणांचा पत्ता कट झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडमधून खासदार प्रितम मुंडे, उत्तर पूर्व मतदारसंघातून मनोज कोटक यांना तर जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचंही तिकीट कापण्यात आलं आहे. तसेच अकोला मतदारसंघात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट मिळाले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथून संधी देण्यात आली आहे. तर धारवाडमधून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, करनालमधून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, सिरसा मतदारसंघातून अशोक तंवर यांसारख्या दिग्गज नेत्यांना रिंगणात उतरवले आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर तर रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या यादीत तीन मंत्र्यांना दणका बसला होता. त्यांना तिकीट दिले नव्हते. या यादीत उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात आणि राजस्थान प्रत्येकी 15, केरळ आणि तेलंगाणा प्रत्येकी 12, झारखंड, छत्तीसगड आणि आसाम राज्यांतील प्रत्येकी 12 जागा आणि दिल्लीतील पाच जागांसह काही अन्य राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.