Bihar Politics : बिहारमधील बेगुसराय (Begusarai) जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटनेवरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) यासाठी बिहार सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांना जबाबदार धरले आहे. भाजप खासदार राकेश सिन्हा म्हणाले की, बेगुसरायमध्ये साठच्या दशकातील परिस्थिती परत येताना दिसत आहे. या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनीही सरकारला घेरले आहे.
भाजप खासदार राकेश सिन्हा म्हणाले की, पोलिस प्रशासनाला इशारा देण्यात आला होता की राजकारण, गुन्हेगारी आणि कंत्राटीपणाचे संगनमत बेगुसरायला पुन्हा साठच्या दशकात घेऊन जात आहे, जेव्हा हत्या सामान्य होती. आज गोळ्यांच्या गारपिटीने डझनभर लोक जखमी झाले आणि मरण पावले. कठोर कारवाईची गरज आहे. बेगुसरायमध्ये, केंद्रीय मंत्री बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मृतांना 1 कोटी रुपये आणि जखमींना 50 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री जंगलराजला जनतेचे राज्य म्हणतात हे बिहारचे (Bihar) दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. बिहारमध्ये सरकार नावाचे काही नाही, गुन्हेगार निर्भय झाले की बेगुसरायसारख्या घटना घडतात. भीती उरलेली नाही. मुख्यमंत्र्यांना उत्तर द्या, असे आव्हान देत ते म्हणाले की, नुसत्या बैठका घेऊन चालणार नाही. मुख्यमंत्री जनता राज अशी जंगलराजची नवी व्याख्या करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे तर राजकारणात मात्र जोरदार पडसाद उमटत आहेत. या घटनेने बिहार सरकार बॅकफूटवर गेले आहे. विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भाजप आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.