Bihar : 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी रणनिती तयार केली जात आहे. तसेच देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही सुरू आहे. विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणारे बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची मागणी ठिकठिकाणी जोर धरत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फुलपूरनंतर आता नितीश कुमार यांना बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हा JDU कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश यांना झंझारपूर लोकसभा मतदारसंघातून 2024 मध्ये निवडणूक लढण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
नितीश झंझाररपूर मतदारसंघातून निवडणूक लढल्यास आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवून इतिहास रचतील, असे जेडीयू पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मधुबनीचे जिल्हाध्यक्ष सत्येंद्र कामत यांनी आणलेला हा ठराव मंजूर केल्यानंतर नेत्यांनी येथून मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढणे देशाच्या भावी पंतप्रधानाच्या निवडणुकीइतकेच महत्वाचे असेल, असे सांगितले. जेडीयूचे ज्येष्ठ नेते विनोद कुमार सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक मधुबनीमधील झंझारपूरमधून लढवावी. येथील जनतेचा आशीर्वाद घेऊनच त्यांनी नावनोंदणी करून देशभर प्रचार करावा. नावनोंदणीनंतर त्यांना पुन्हा येथे येण्याची गरज भासणार नाही.
माजी आमदार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे मधुबनी जिल्ह्याशी जुने नाते आहे. झंझारपूरमधून निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्णय हा केवळ पक्षाचा निर्णय नाही तर जनतेचाही निर्णय आहे. हा आवाज लोकांमधून येत आहे. अशा परिस्थितीत मधुबनी जेडीयू परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह, प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह यांना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या ठरावाची माहिती दिली जाईल.