Bihar Cabinet : नितीश मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला. राजभवनात एकूण 31 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्याच बरोबर मंत्र्यांमध्ये खात्यांची विभागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि गृह विभागासह एकूण पाच मंत्रालये असतील. तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडे आरोग्य आणि रस्ते बांधणीसह चार मंत्रालये देण्यात आली आहेत.
नितीश कुमार (मुख्यमंत्री) यांच्याकडे सामान्य प्रशासन, कॅबिनेट सचिवालय, पर्यवेक्षण, निवडणूक या खात्यांचा कारभार राहणार आहे. तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे आरोग्य, रस्ता इमारत, शहरी विकास आणि गृहनिर्माण, ग्रामीण काम अशी खाती देण्यात आली आहेत. तेजस्वी यादव यांचे भाऊ तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्याकडे पर्यावरण, जल आणि जलवायू परिवर्तन अशी खाती देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही आमदारांना खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. विजयकुमार चौधरी यांना वित्त, व्यापार कर, संसदीय कामकाज तर बिजेंद्र प्रसाद यादव यांना ऊर्जा, नियोजन आणि विकास तसेच आलोक कुमार मेहता यांना महसूल आणि जमीन सुधारणा खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.
या खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नसल्याचे सांगण्यात येत असले तरी उपेंद्र कुशवाहा (Upendra Kushwaha) मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. मंत्रीपदाच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते जेडीयू (JDU) पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी असल्याने नेतृत्वाने त्यांना मंत्रीपदी संधी दिली नसल्याची चर्चा बिहारच्या (Bihar) राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याबाबत स्पष्ट काही नाही.
नितीश कुमार यांनी भाजपबरोबर (BJP) आघाडी तोडून राजद (RJD) बरोबर हातमिळवणी केली. त्यामुळे येथे भाजप आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता नवीन सरकार काय कामकाज करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.