सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पुढील पाच वर्षांत पेट्रोकेमिकल्स, सिटी गॅस आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात 1.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार सिंह (Arun Kumar Singh) यांनी ही माहिती दिली आहे. “जोखीम कमी करताना उदयोन्मुख संधींचा फायदा घेण्यासाठी कंपनी आपल्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करत आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले .
अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी आणि द्रव जीवाश्म-इंधन व्यवसायात भविष्यातील कोणत्याही संभाव्य मंदीचा धोका टाळण्यासाठी इतर पर्यायी व्यवसायांमध्ये विविधता आणण्याची आणि विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. देशातील 83,685 पेट्रोल पंपांपैकी 20,217 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे (Bharat Petroleum Corporation)आहेत. कंपनी केवळ पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचीच (Diesel) विक्री करत नाही, तर इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) चार्ज करण्यासाठी हायड्रोजनसारखे (Hydrogen) भविष्यकालीन इंधनही पुरवठा करत आहे.
अरुण कुमार सिंग म्हणाले, की “कंपनीने या प्रत्येक धोरणात्मक क्षेत्रांतर्गत तपशीलवार रोडमॅप तयार केला आहे आणि पुढील पाच वर्षांत सुमारे 1.4 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना आखली आहे.” यामध्ये कंपनी तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये पेट्रो केमिकल प्रकल्पही उभारणार आहे. जगभरातील देशांनी स्वच्छ, कार्बनमुक्त इंधनाची निवड केल्यामुळे, तेल कंपन्या हायड्रोकार्बन ऑपरेशनचे धोके टाळण्यासाठी इतर व्यवसाय शोधत आहेत. इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजनवर भर दिल्याने कंपन्या याकडे आकर्षित होत आहेत.
जगभरात प्रदूषणाची समस्या प्रचंड वाढली आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्याला अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात आहे. तसेच पर्यायी इंधनही शोधण्यात येत आहे. अनेक देशांनी स्वच्छ, कार्बनमुक्त इंधनाची निवड केली आहे. त्यामुळे आता तेल कंपन्यांना त्यानुसार आपल्या धोरणात बदल करावा लागत आहे.